‘एक गाव, एक गणपती’साठी जयसिंगपूर पोलिसांचा पुढाकार
By Admin | Updated: August 5, 2014 00:10 IST2014-08-04T23:10:17+5:302014-08-05T00:10:04+5:30
तीन गावांचा प्रतिसाद : डॉल्बिमुक्त गणेशोत्सवाचा उपक्रमही राबविणार

‘एक गाव, एक गणपती’साठी जयसिंगपूर पोलिसांचा पुढाकार
संदीप बावचे -जयसिंगपूर , समाज एकसंध राहावा, भेदभाव नष्ट व्हावा, गावात एकोपा रहावा या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याने आता पुढाकार घेतला आहे. डॉल्बिमुक्त गणेशोत्सवाबरोबरच हा उपक्रमही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये राबविण्याची संकल्पना निश्चितच अन्य पोलीस ठाण्यांसमोर प्रेरणादायी ठरणार आहे. कोथळी, उमळवाड व कोंडिग्रे ही तीन गावे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी सज्ज झाली आहेत.
समाजाचे प्रबोधन व्हावे, असा उदात्त हेतू घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची सामाजिक चळवळ सुरू झाली. ही चळवळ अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच भावनेतून सव्वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबर ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींंची बैठक आयोजित करून यावेळी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बहुतांश गावांत ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याबाबत पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, निर्मलग्राम अशा शासनाच्या विविध योजनांत सहभाग घेऊन अनेक पुरस्कार पटकाविलेल्या कोथळीपासून उपक्रमास सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून गावातील विविध घटनांमुळे हे गाव राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनले असतानाच ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्याच्या निर्णय घेऊन गावाने एकोप्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. उमळवाड व कोंडिग्रे गावांनीदेखील या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.
पहिल्या टप्प्यात तीन गावे
पहिल्या टप्प्यात या तीन गावांनी प्रतिसाद दिला असून, आता दानोळी, जैनापूर, निमशिरगाव, चिपरी, उदगाव, संभाजीपूर, कवठेसार, तमदलगे, आदी गावांतदेखील ही संकल्पना राबविण्यासाठी पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून डॉल्बिमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी मुक्तीबरोबरच ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रमदेखील चांगल्या प्रमाणात यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विविध मंडळांनी गणरायाची स्थापना करणे आणि मिरवणुकीत ईर्षा निर्माण होऊन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात एकोपा रहावा या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमापासून एक चांगली सुरुवात गावांनी करावी. त्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस ठाण्याच्या या आवाहनाला गणेशोत्सव मंडळे निश्चितच प्रतिसाद देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.