लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर (जि. सोलापूर) : राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्तिकी यात्रेनिमित्त ते येथे आले होते.
पेट्रोल-डिझेलच्या करांबाबत ते म्हणाले की, येत्या अधिवेशनापूर्वी यावर कर कमी करायचे असतील तर, किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण केले तर चुकीचा पायंडा पडून सर्व महामंडळांचे कर्मचारीदेखील अशी मागणी करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाले तर उद्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हेही तशी मागणी करतील, असे ते म्हणाले. गेल्या ६० वर्षांत कधी एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दामहून हा प्रश्न चिघळवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.