It doesn't matter if you want me ...! | तुम अगर मुझको चाहो तो कोई बात नही...!
तुम अगर मुझको चाहो तो कोई बात नही...!

तुम अगर मुझको ना चाहो 
तो कोई बात नही,
तुम किसी और को चाहोगी
तो मुश्किल होगी,
मुझको वो दिन ना दिखाना
तुम्हें अपनी ही कसम,
मैं तरसता रहूँ 
तुम गैर की बाहो में रहो 

महान कलाकार राजकपूर यांच्या ५५ वर्षांपूर्वीच्या ‘दिल ही तो है’ मधील गाजलेल्या मुकेशच्या गाण्याची आठवण करुन देणारी आजची ‘दुनियादारी’तील ही कोर्ट स्टोरी.. 

प्रेयसीच्या खुनाच्या आरोपावरुन ‘त्यास’ अटक झालेली होती. दोघेही उच्च शिक्षित. पुण्यात नोकरीला. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. ‘ती’ सोलापूर शहरातील तर ‘तो’ ग्रामीण भागातील. ‘तो’ कंपनीत अधिकारीपदावर होता. ‘ती’ त्याच्या हाताखाली त्याचीच सहायक म्हणून सेवेत होती. ‘ती’ दिसायला अतिशय सुंदर, पण तेवढीच महत्वाकांक्षी. दोघांचे प्रेमप्रकरण सुरु व्हायला थोडादेखील वेळ लागला नाही. सुमारे दोन वर्षांनंतर त्याची बदली पुण्यातच, पण दुसºया आॅफिसला झाली. तो नव्या नेमणुकीवर रुजू झाला. त्याच्या जागी आलेल्या ‘बॉस’बरोबर तिचे प्रकरण सुरु झाले. मग ती त्याचे कॉल घेणे टाळू लागली. प्रकृतीची कारणे सांगून त्याचा सहवास टाळू लागली.

तिच्याविना तो वेडापिसा झाला. त्याला नैराश्याने घेरले. तो गावाकडे परत आला. दिवसभर तिची आठवण दारुच्या ग्लासात काढू लागला. तिच्याऐवजी त्याची मैत्री दारुबरोबर झाली. नोकरीला जाणे बंद केले. तिच्याशिवाय जगणे अशक्य झाल्याने त्याने विष घेऊन जीव देण्याचे ठरविले. दारुत विष मिसळून प्राशन केले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्या लोकांनी त्यास दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. डॉक्टरांनी अथक परिश्रम करुन त्याचा जीव वाचविला. घरच्यांना आनंदाचे भरते आले. घरी गेल्यानंतर पुन्हा त्यास तिची आठवण येऊ लागली. एकेदिवशी तो तिला भेटण्यासाठी पुण्यास गेला. ती त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही. त्याच्या मनास खूप लागले. तो परत गावी आला. तिची आठवण काहीकेल्या त्याच्या मनातून जात नव्हती. घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी मुली बघण्यास सुरु केले. प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी दोष काढून तो ते स्थळ नाकारत होता.

एक दिवस तिच्या फेसबुक अकौंटवर तिने तिचा व तिच्या प्रियकराचा प्रेमाने ओथंबलेला फोटो पोस्ट केला होता. दोघेही लग्न करणार असल्याचे सूचित केले होते. तो फोटो बघून त्याचे डोके फिरले. आपण मृत्यूला जवळ केले होते. परंतु मृत्यूने आपल्याला जवळ केले नाही. आपल्या हातून काही तरी कृत्य घडविण्यासाठीच आपण मृत्यूच्या दरवाजातून परत आलो आहोत, अशी समजूत त्याने करुन घेतली. आपल्याला दगा देणाºया ‘तिला’ आता संपवायचेच, असा पक्का निर्धार त्याने केला. त्यासाठी चाकू खरेदी केला. रात्रीच्या गाडीने भल्या सकाळी पुण्याला पोहोचला. तिचा प्रियकर तिच्या खोलीवरच मुक्कामास होता. योगायोगाने त्याने खिडकीतून त्याला बिल्डिंगकडे येताना बघितले. प्रियकर पार घाबरुन बूट न घालता लगबगीने पळून गेला. तो तिच्या रुमवर गेला. बेल दाबली. तिने दरवाजा उघडला. तिला तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल जाब विचारला. तिने सर्व काही उडवून लावले. माझे कुठलेही प्रेमप्रकरण नाही. तू उगीचच संशय घेत आहेस, असे सांगितले. त्याचे लक्ष तेथे असलेल्या बुटाकडे गेले. हा कोणाचा बुट आहे? असे विचारताच ती चपापली. तिला उत्तर देता येईना. घरातील बेडची परिस्थिती पाहून त्याचे डोके फिरले. तो सुडाने पेटला होता. त्याने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले. पोलीस स्टेशनला फोन गेला. पोलिसांची गाडी आली. त्याला पकडून नेले. त्याच्यावर खुनाचा खटला दाखल झाला. पुरावा  भक्कम होता. फाशी चुकली तर आपले नशीब, असे त्याच्या नातेवाईकांना मी स्पष्टपणे सांगितले होते. यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. आजूबाजूचे नेत्रसाक्षीदार आणि परप्रांतीय प्रियकराच्या साक्षीवरुन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. 

वाचकहो, ती तरुण वयातच देवाघरी गेली आणि तो जन्मठेपेला गेला. दोघांची कुटुंबे दु:खाच्या खोल दरीत लोटली गेली. कोमल असलेले प्रेम एवढे क्रूर का होते बरे?
... म्हणूनच राज कपूरच्या ‘दिल ही तो है’ मधील गाणे पुन्हा आठवते.
मुझको वो दिन ना दिखाना 
तुम्हें अपनी ही कसम,
मैं तरसता रहूँ 
तुम गैर की बाहो में रहो 
प्रेमाचा गुलाब यामुळे तर रक्तरंजीत झाला नसेल ना?
- अ‍ॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.) 


Web Title: It doesn't matter if you want me ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.