लोखंडी बाकडे खरेदीचा विषय तहकूब
By Admin | Updated: June 28, 2014 00:42 IST2014-06-28T00:42:19+5:302014-06-28T00:42:19+5:30
मनपा स्थायी समिती सभा : सत्ताधाऱ्यांचा डाव फसला

लोखंडी बाकडे खरेदीचा विषय तहकूब
सोलापूर : शहरातील विविध नगरसेवकांनी मागणी केलेल्या लोखंडी बाकडे खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत तहकूब करण्यात आला.
स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी महापालिकेत सभा झाली. या सभेत नगर अभियंता कार्यालयाकडून नगरसेवकांकडून बाकडे खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला. यात मक्तेदार अमरदीप कन्स्ट्रक्शनकडून प्रति नग १९५0 प्रमाणे ४ लाख ९९ हजारांचे २५६ बाकडे खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यापूर्वी असे बरेच बाकडे वाटप झाले आहेत. नंतर त्या बाकड्यांचे काय होते हे समजत नाही. त्यामुळे अशा बाकड्यांची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून सभापती मिस्त्री यांनी हा विषय तहकूब केला. तसेच याचा मक्तेदाराचा ९८0 प्रमाणे ५१0 ट्री गार्ड खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला. मात्र प्रभाग क्र. ४७ साठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी प्रति नग ७ हजार ७५0 रुपयांचे ४0 व्हीआयपी लोखंडी बेंच खरेदीला एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रगती स्टील फॅब्रिकेशनला हा मक्ता देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य अभियंता विभागाने जीआय पाईप पुरविण्याची लक्ष्मी नारायण सेल्स कॉर्पोरेशनचा १५ लाखांचा प्रस्ताव झोनकडे माहिती नसल्याने व अक्कलकोट रोड परिसरात डीआयके ७ ग्रेडच्या पाईप पुरविणे व घालण्याचा सद्गुरू इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चा ८१ लाखांचा प्रस्ताव फेरसादर करण्यासाठी पाठविण्यात आला. सन १९९५ पूर्वीच्या रोजंदारीतून आस्थापनेवर कायम झालेल्या सेवकांचे निवृत्ती वेतन व उपदानाबाबतचा प्रस्ताव, नेहरूनगर पाण्याची टाकी ते नवीन आरटीओ कार्यालयापर्यंत पाण्याची पाईपलाईन घालण्याच्या मयुरा कन्स्ट्रक्शनच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
-----------------------------
‘हुतात्मा’ भाडेवाढ नाही
हुतात्मा स्मृती मंदिर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून, भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविला होता. पण स्थायी समितीने कोणतीही दरवाढ न करता पूर्वीच्याच दराने भाडे आकारण्यास एकमताने मान्यता दिली. आतील खुर्च्या किंवा इतर साहित्याची मोडतोड संबंधितांकडून वसूल करावी, त्यासाठी काही रक्कम डिपॉझिट म्हणून घेण्यास मान्यता देण्यात आली.
------------------------
श्वानदंश लस खरेदी
डफरीन प्रसूतिगृहातील राजमाता अहिल्यादेवी होळकर केंद्रासाठी १४२ रूपये ५0 पैसे या दराने पाच हजार श्वानदंश लस खरेदीचा निर्णय एकमताने झाला. मुंबईच्या श्री. जी. इंटरनॅशनल या मक्तेदारास हे काम देण्यात आले आहे.