पोलिस विभागातील २२५ पैकी १०९ बदल्यांमध्ये अनियमितता
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 29, 2024 19:27 IST2024-02-29T19:27:05+5:302024-02-29T19:27:27+5:30
श्रीकांत देशपांडे : त्यांच्या बदली बद्दल म्हणाले बदल्यांची सवय आहेच.

पोलिस विभागातील २२५ पैकी १०९ बदल्यांमध्ये अनियमितता
सोलापूर : पोलिस विभागातील २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यातील १०९ जणांची त्यांच्याच जिल्ह्यात सहाय्यक पदावर बदली झाली आहे. यात अनियमिता असल्याने अनेकजण मॅट मध्ये गेले आहेत. यात अनियमितता असल्याने संबंधित बदल्या रद्द करून निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार जिल्ह्याबाहेर त्यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी सोलापुरात दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी श्रीकांत देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. याच दरम्यान बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी त्यांची देखील मुख्य निवडणूक अधिकारी या पदावरून बदली झाली आहे. त्यांच्या बदली बद्दल विचारले असता बदल्यांची सवय आहे, असे ते म्हणाले. प्रशासनात राहून बदल्यांची सवय लावून घ्यावी लागते. नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम हे देखील पूर्ण ताकदीने काम करतील, असेही ते म्हणाले.