जनगणनेमध्ये बौद्धांनी जातीचा उल्लेख करण्याऐवजी तिथे बौद्ध असाच उल्लेख करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 16:12 IST2021-08-06T16:10:54+5:302021-08-06T16:12:02+5:30
बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे मत

जनगणनेमध्ये बौद्धांनी जातीचा उल्लेख करण्याऐवजी तिथे बौद्ध असाच उल्लेख करावा
सोलापूर : जनगणनेमध्ये बौद्धांनी जातीचा उल्लेख करण्याऐवजी तिथे बौद्ध असाच उल्लेख करावा. अनुसूचित जातीचे आरक्षण घेण्यापेक्षा बौद्ध म्हणून अल्पसंख्याक आरक्षण घ्यावे, असे आवाहन बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.
राजरत्न हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. पत्रकारांशी बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेच्या कॉलममध्ये काय लिहावे याविषयी लोक संभ्रमावस्थेत आहेत. अनुसूचित जातीमधल्या अनेक जातीतील लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. त्यामुळे त्यांनी जनगणनेमध्ये बौद्ध लिहावे. बाबासाहेबांनी आपणाला बौद्ध केले आहे. त्यामुळे आपण सरकारकडे मदत मागण्यापेक्षा बौद्ध म्हणून शिक्षण, आरोग्य, आर्थिक प्रगतीसाठी बौद्ध राष्ट्रांकडून मदत घेऊ शकतो. जोपर्यंत जातीचा उल्लेख आपण करु तोपर्यंत जाती समाजातून जाणार नाहीत.
जनगणनेत धर्माच्या प्रश्नानंतर जातीच्या प्रवर्ग व जातीचा उपप्रश्न विचारला आहे. त्यामुळे धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहून पुन्हा त्यापुढे जातीचे नाव लिहावे लागणार आहे. आरक्षणाच्या समर्थकांनुसार जातीचा उल्लेख न केल्यास आरक्षण कमी होण्याची शक्यता आहे, त्यांचे म्हणणे खरेही आहे. पण, आरक्षणाच्या मागे न जाता, स्वत:ची ओळख जातीवर न ठेवता आपण बौद्ध धम्म स्वीकारला त्याचाच उल्लेख तिथे करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर यांनी तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहातील बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. बैठकीत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीची निवड केली. अध्यक्षपदी राजश्री गायकवाड, कोषाध्यक्षपदी दीपा लोंढे तर महासचिवपदी रामजी गायकवाड यांची निवड करण्यात आली.