शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक
By Appasaheb.patil | Updated: March 30, 2024 18:13 IST2024-03-30T18:12:45+5:302024-03-30T18:13:46+5:30
काही दिवसांपूर्वी याच टोळीने कमलाई कारखान्याची २५ लाखांची फसवणूक केली होती अशी माहिती करमाळा पोलिसांनी शनिवारी दुपारी दिली.

शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक
करमाळा : शेअर मार्केटमध्ये दुप्पट गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून करमाळा तालुक्यातील चौघांची सहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी परप्रांतीय दोघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच टोळीने कमलाई कारखान्याची २५ लाखांची फसवणूक केली होती अशी माहिती करमाळा पोलिसांनी शनिवारी दुपारी दिली.
करमाळा तालुक्यातील मांगी सोसायटीचे सुजित संभाजी बागल (रा. मांगी), समाधान भोगे (रा. अर्जुननगर), गणेश सरडे (रा.करंजे) व सागर शिंदे (रा.जातेगाव) यांची प्रत्येकी दीड लाख रुपयाची फसवणूक झाली आहे. यामध्ये सुजित बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पलविंदरसिंह जनरेलसिंह आणि श्रीनिवास मिंडा या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कमलाभवानी साखर कारखान्यांवर कामानिमित्त गेल्यावर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी व श्रीनिवास मिंडा व पलविंदरसिंह यांची भेट झाली होती.
पलविंदरसिंह जनरेलसिंह यांनी बागल व इतर तिघांना आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावून गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा १०० टक्के परतावा देतो, साधारणतः दोन महिन्यांमध्ये गुंतवणूकदाराने गुंतविलेल्या रकमेचा दुप्पट परतावा देतो असे सांगितल्याने सुजित बागलसह अन्य तिघांनी प्रत्येकी दीड लाख रुपये श्रीनिवास मिंडा व पलविंदरसिंह जनरेलसिंह यांना दिले. त्यावर मिंडा यांनी त्यांचे नाव असलेला बारा लाख रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वारासीगुडा हा १५ मार्च तारीख नोंदविलेला चेक हमी म्हणून बागल यांना दिला. त्यानंतर त्यांनी दिलेला चेक बँकेत वटवण्यासाठी पलविंदरसिंह जनरेलसिंह व मिंडा यांना संपर्क साधला असता संपर्क झाला नाही व रक्कमही मिळाली नसल्याचे शनिवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.