वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:15 IST2025-01-10T14:14:05+5:302025-01-10T14:15:00+5:30
यासाठी २ कोटी निधीची मागणी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार
Pandharpur Wari: "शिवाजी चौकातली गर्दी कमी करा, दर्शन मंडपासमोरील गर्दी पुढे न्या, वारकरी मायबाप थांबू नका, चालत राहा, पुढे व्हा," अशा सूचना देणारा पोलिस बांधव पंढरपूरच्या वारीत सर्वांच्या नजरेस हमखास पडतात. थांबलेली गर्दी, तसेच गर्दीमुळे संभाव्य चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वारी काळात पोलिसांवर प्रचंड तणाव असतो. हा तणाव कमी करण्यासाठी, तसेच आपत्कालीन घटना रोखण्यासाठी एआयचा वापर करता येईल. त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, तसेच २ कोटी निधीची मागणी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी सांगितले, सध्या आम्ही पंढरपूरची वारीच्या पार्श्वभूमीवर एआयसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर त्याचा वापर देशातील कोणत्याही यात्रेत होऊ शकतो. हा देशातील पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो. यामुळे अनियंत्रित गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरी थांबेल, आपत्कालीन घटना रोखता येतील, मनुष्यहानी थांबवता येईल, पोलिसांवरील तणाव कमी होईल, आवश्यकता उपाययोजना तात्काळ करता येईल, वारकऱ्यांना किंवा भक्तांना आवश्यक सोयी-सुविधा देता येतील. यासोबत पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा व्हीआयपींच्या दौऱ्यातसुद्धा या सॉफ्टवेअरचा वापर करता येईल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
दरम्यान, "मँचेस्टर सिटीतील मेट्रोपॉलिस युनिव्हर्सिटी ऑफ क्रॉड सायन्सचे प्राध्यापक सी. केथ स्टिल यांनी गर्दी व्यवस्थापनावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार ४ माणसांना उभारण्यासाठी परस्क्वेअर मीटरची जागा आवश्यक आहे. ही सुरक्षित गर्दी मानली जाते. सुरक्षित गर्दी संबंधित सूचना आणि माहिती एआयच्या माध्यमातून मिळवण्यासाठी आम्ही एक प्रस्ताव तयार केला आहे. ड्रोन, सीसीटीव्ही, सॅटलाइट तसेच जीपीएसच्या माध्यमातून एआय सूचना देत राहील. त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. त्यासाठी २ कोटी निधी लागणार आहे," अशी माहिती सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी दिली आहे.