चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेमधील बाधित शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 15:36 IST2023-04-18T15:36:10+5:302023-04-18T15:36:42+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती बाळासाहेब मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेमधील बाधित शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर...
शंभुलिंग अकतनाळ, सोलापूर: बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे हे आपल्या शिष्टमंडळासह गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे होते. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समक्ष भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा, यासंदर्भात बैठक लावण्याविषयी विनंती केली असता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती बाळासाहेब मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
यावेळी बाळासाहेब मोरे यांच्या समवेत कुरनुरचे माजी उपसरपंच लक्ष्मण बेडगे, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांना आता न्याय निश्चितपणे मिळेल असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलने झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्री, खासदार, आमदारांच्या भेटी घेऊन मोबदला वाढविण्यासाठी निवेदन, चर्चा, बैठका घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही यासंदर्भात बैठक घेतली होती. सध्या सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग होत आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी यांनी मोबदला वाढवून देण्याची मागणी केली आहे. मोबदला वाढविला नाही तर कामाला विरोध करणार असल्याची शेतकरी यांची भूमिका आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"