सांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:49 IST2018-02-08T14:42:14+5:302018-02-08T14:49:18+5:30
न्यू धनश्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन सील असताना पुन्हा न्यु धनश्री या नावाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा उद्योग डॉ. जाधवर दाम्पत्यांनी सुरू केला होता.

सांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील
सांगोला दि ८ : येथील न्यू धनश्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन सील असताना पुन्हा न्यु धनश्री या नावाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा उद्योग डॉ. जाधवर दाम्पत्यांनी सुरू केला होता. बुधवारी केलेल्या कारवाईत दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर व प्रसूतिगृह सील करून सर्व कागदपत्रे जप्त केली व डॉ. सुहास जाधवर व डॉ.आश्विनी जाधवर या डॉक्टर दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्या आदेशानुसार काल बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास सांगोला शहरांतर्गत कडलास नाक्यावरील न्यू धनश्री हॉस्पिटलवर विधी समुपदेशक अॅड. रामेश्वरी माने, कक्ष सेवक हनिफ शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप बेलपत्रे, नायब तहसीलदार बागडे, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, तलाठी हरिश्चंद्र जाधव यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी हॉस्पिटलमधील कागदपत्रांची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. तर एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचे व गर्भामध्ये अर्भकाचा मृत्यू झाल्याचा गर्भपात तसेच एका अविवाहित मुलगी गर्भपात करण्यासाठी दाखल करण्यात आली होती असे कागदपत्रांवरून या पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सर्व कागदपत्रे जप्त करून प्रसूतिगृह व आॅपरेशन थिएटर सील केले आहे. डॉ.सुहास जाधवर व डॉ.आश्विनी जाधवर या डॉक्टर दाम्पत्यावर रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
डॉ.सुहास जाधवर यांनी शासनाची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून न्यु धनश्री या नावाने पूर्वीच्याच जागेवर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केला जात होता. असे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप बेलपत्रे यांनी सांगितले.