'लोकसभा निवडणुकीपूर्वी मलाही भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. पण माझ्या रक्तात काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार. काही जण त्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे काँग्रेस सोडून जात आहेत', असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी 'लोकमत'ला सदिच्छा भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसने तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. दिल्लीच्या वर्तुळात तुमचा - वावर आहे. या काळात भाजपकडून तुम्हाला - प्रवेशाची ऑफर येते का, या प्रश्नावर खासदार शिंदे म्हणाल्या, 'लोकसभा निवडणुकीपूर्वी मला अनेकदा विचारणा झाली होती. पण मी पुरोगामी विचारांची आहे. काँग्रेसच्या विचारांवर माझा विश्वास असल्यामुळे त्यांचा विचार केला नाही.'
...तर काँग्रेसची सत्ता आली असती
'लोकसभा निवडणुकीत मी गावोगावी फिरले. या काळात मला लोकांचा भाजपबद्दलचा रोष दिसून आला. देशभर ही परिस्थिती होती. आम्ही आणखी मेहनत घेतली असती तर काँग्रेसची सत्ता आली असती. लोकसभेच्या निकालामुळे भाजपचे लोक जागरूक झाले. त्यांनी खूप खालच्या पातळीचे राजकारण केले', असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
आम्हाला कशाची भीती ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला घाबरून काँग्रेस पक्ष सोडला. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आमच्याकडे कारखाना, शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाला घाबरण्याचे काही कारण नाही.
लोक काय म्हणतात...
काँग्रेस सरकारच्या काळात आमच्यावर टीका व्हायची. ही टीका का होतेय हे समजून आम्ही काम करायचो. आता राज्यातील प्रशासनावर मोठा दबाव आहे. आता मी गावोगावी जाते. मागच्या दहा वर्षांत खासदार भेटत नव्हते. खासदार दिसत नव्हते, असे लोक सांगतात. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. निधी कमी पडतोय, असेही खासदार शिंदे म्हणाल्या.