हुरडा.. चक्क मळणी यंत्रानं भरडला अन् पोत्यानं वाटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 10:03 IST2020-01-29T10:02:13+5:302020-01-29T10:03:41+5:30
संगोगी येथे हुरडा महोत्सव; हजारो भाविकांनी घेतला हुरड्याचा आस्वाद

हुरडा.. चक्क मळणी यंत्रानं भरडला अन् पोत्यानं वाटला
प्रभू पुजारी
सोलापूर : हुरडा म्हटला की छोटीशी आगटी.. त्यावर गोवºया किंवा सरपणाचं विस्तव तयार करून त्यात कणसं भाजणं.. मग चोळलेला हुरडा खाणं इतकंच़ सोबतीला विविध प्रकारच्या चटण्या, वांग्याची भाजी आलीच, त्यालाच हुरडा पार्टी हे नवं नाव पडलं, पण आश्चर्य वाटेल की, संगोगी (बसवन) येथील कालिकाभवानी हुरडा महोत्सवात तुराट्यावर हुरड्याची कणसं भाजून चक्क मळणी यंत्राद्वारे भरडली जातात अन् पोत्यांनी हुरडा वाटला जातोय़ त्याचा हजारो भाविक आनंदाने आस्वाद घेतात़ याचीच हुरडा महोत्सव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगोगी (बसवन) येथील श्री कालिकाभवानी मंदिराच्या भव्य परिसरात श्री कालिकाभवानी हुरडा महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात नुकताच पार पडला.
श्री कालिकाभवानी कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प. पू. सद्गुरु देविदास महाराज, गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या हुरडा महोत्सवाची सुरुवात श्री कालिका मातेला अभिषेक व पारंपरिक विधी पूजनाने करण्यात आली.
या हुरडा महोत्सवात आलेल्या शेतकºयांना प्रबोधन व्हावे म्हणून राष्ट्रीय एकात्मता, धर्म, शक्ती, भक्ती, सामर्थ्य, संस्कृती, अध्यात्म, निसर्ग, पर्यावरण, शेती, पाणी, कला, विज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले जाते़ दुपारी भाविकांना वांग्याची भाजी, शेंगा चटणी, ज्वारी व बाजरीच्या भाकरी, खीर(सांजा) भाविकांना महाप्रसाद म्हणून दिला जातो़ त्यानंतर थंड ताकाचीही व्यवस्था केली जाते़ या महोत्सवात शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
अजूनही दिसतेय बैलगाड्यांची रांग
- यात्रेला जायचंय म्हटलं की, बैलांना रंगवून सजवले जाते़ गळ्यात चंगळपट्टा बांधला जातो़ संगोगी (बसवन) येथील कालिकाभवानी देवी हुरडा महोत्सवासाठी संगोगी (बसवन), बिंजगेर, हालहळ्ळी, तळेवाड या गावांतील शेतकरी अजूनही बैलगाडीतून या महोत्सवाला जातात़ बैलगाड्यांची ती रांग दिसते़ या महोत्सवात जवळपास ५० पेक्षा जास्त बैलगाड्या येतात़ शेतकरी या महोत्सवासाठी जाताना स्वत:च्या शेतातील हुरडा घेऊन जातात़ त्या ठिकाणी सर्व शेतकºयांचा हुरडा एकत्रित करून तो तुराट्यावर भाजला जातो़ त्यानंतर मळणी यंत्राद्वारे भरडला जातो़ पोत्यातून तो भाविकांना वाटला जातो़ ही अनोखी परंपरा संगोगी (बसवन) येथे अजूनही जपली जाते़