सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक
By Appasaheb.patil | Updated: April 21, 2023 17:29 IST2023-04-21T17:29:19+5:302023-04-21T17:29:43+5:30
कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा व आरती करण्यात आली.

सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक
सोलापूर : श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळातर्फे बसवेश्वर जयंतीच्या निमित्त शुक्रवारी जलकुंभ व बसव वचन साहित्याची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी कौतम चौक येथील पुतळ्याजवळ शिवलिंगाला जलाभिषेकही करण्यात आला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.
कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. येथून सुरू झालेली जलकुंभ मिरवणूक बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, कुंभारवेसमार्गे कोंतम चौकात पोहोचली. मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज होता. सोबत हलगी पथक, ढोल - ताशा अशी पारंपरिक वाद्ये होती. जवळपास ५०० सुवासिनी महिला डोक्यावर जलकुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या . अग्रभागी श्री बसवेश्वर महाराजांचे वचन साहित्य डोक्यावर घेतलेल्या महिला भक्तगण होते. महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची प्रतिमेसह सजवलेला रथ शेवटी होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुताई काडादी, राजश्री थळंगे, माजी नगरसेवक चिदानंद वनारोटे, राजशेखर हिरेहब्बू, बसवराज शास्त्री हिरेमठ, बसय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील, उत्सव अध्यक्ष संदीप दुगाणे, बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, उत्सव उपाध्यक्ष साईप्रसाद पाटील, ट्रस्टी गणेश साखरे, वीरेश उंबरजे, आशिष बसवंती, शिवराज झुंजे, मल्लिनाथ पाटील, प्रेम भोगडे आदी उपस्थित होते.