गवत्या सापावर दीड तास चाचली शस्त्रक्रिया; अबसेस आजारावर केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:20 IST2021-02-04T13:20:51+5:302021-02-04T13:20:57+5:30
राज्यात पहिलीच सापाच्या ‘अबसेस’ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

गवत्या सापावर दीड तास चाचली शस्त्रक्रिया; अबसेस आजारावर केली मात
सोलापूर : शहरात आढळलेला गवत्या साप जो ‘अबसेस’ या आजाराने त्रस्त होता. त्यावर डाॅ. राकेश चित्तोङ व डाॅ. आकाश जाधव यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. दीड तास चाललेली ही शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२९ रोजी वन्यजीवप्रेमी भीमसेन लोकरे व लुकास वादीयार हे शुक्रवारी नई जिंदगी परिसरात रात्री दहा वाजता सर्प काॅलवर गेले असता, त्यांना गवत्या साप आढळला. सापाची पाहणी केली असता, अंगावर तीन मोठ्या गाठी दिसल्या. याबाबत माहिती वन्यजीवप्रेमी मुकुंद शेटे यांना दिली. शेटे यांनी सापाला उपचारासाठी ॲनिमल राहत संस्थेकडे घेऊन आले.
तपासणी केली असता गाठीमध्ये मोठ्या प्रमाणात पू भरलेला होता. त्यावरून हा ‘अबसेस’ आजार असल्याचे समजले. रविवारी या सापावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्वकाही ठीक झाल्यानंतर या सापाला बुधवारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याप्रसंगी वनविभागाचे वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक शुभांगी कोरे, वनरक्षक गोवर्धन वरवटे, डाॅ. आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, भीमसेन लोकरे, प्रवीण जेऊरे, मुकुंद शेटे उपस्थित होते. ही मोहीम उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.