गुढी पाडवा... साच्यातील गरम पाकाचे साखरहार; सोलापुरी गोडी जाते महाराष्ट्र सीमापार
By काशिनाथ वाघमारे | Updated: March 11, 2023 16:48 IST2023-03-11T16:47:30+5:302023-03-11T16:48:20+5:30
कच्चा माल, मजुरीत वाढ : पंढरपूर, करमाळ्यातून आले कारागीर

गुढी पाडवा... साच्यातील गरम पाकाचे साखरहार; सोलापुरी गोडी जाते महाराष्ट्र सीमापार
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरहारांची चाहूल सण-उत्सवप्रेमींना लागली आहे. पंढरपूर अन् करमाळ्यातून आलेले कारागीर गिरणगावात दाखल झाले असून, शहरातील मध्यवर्ती भागात शुक्रवार पेठेतील कारखान्यांमध्ये साखरहार बनवण्याच्या कामाला गती आली आहे. यंदाही सोलापूरच्या साखरहारांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह कर्नाटक राज्यातूनही मागणी आहे.
दर महाशिवरात्रीनंतर आठ दिवसांनी साखरहार बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदाही या कामाला सुरुवात झाली आहे. होळीपूर्वी हे साखरहार सोलापुरातून कर्नाटकात दाखल होतात; तर रंगपंचमीनंतर मराठवाडा आणि सोलापूर शहरातील विक्रेत्यांकडे विक्रीला येतात.
शहरात आहेत १२ भट्ट्या अन शंभर मजूर, कारागीर
जोखमीच्या साखरहाराचे काम भट्ट्यांवर चालते. सोलापूर शहरात शुक्रवार पेठ आणि शेळगी परिसरात जवळपास १२ भट्ट्या चालताहेत. या भट्ट्यांवर कारागिरांसह जवळपास शंभर कामगारांचे हात साखरेत राबताहेत.
दररोज ५०० किलो साखरहार
शहरातील प्रत्येक भट्टीत दररोज जवळपास ५०० किलो साखरहार तयार होतात. सागवानी लाकडाच्या एका साच्यात एका वेळी आठ साखरहार तयार होतात. २० मिनिटांत हा हार तयार होतो. गरम साखरेच्या पाकात काही प्रमाणात लिंबूचा रस मिसळून त्याची चाचणी केली जाते. नंतर तो साच्यात ओतला जातो. त्यानंतर त्यात लांब दोरे टाकतात आणि साचा थंड झाला की ते उघडून हार वाळवायला लटकवतात.
---
मागील वर्षी साखरेचा दर ३३०० रुपये क्विंटल होता. यंदा तो ३५०० रुपयांवर पोहोचला आहे. कामगारांची मजुरीही २० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी शंभर किलो साखरहार बनवायला आठ हजार मजुरी होती. आता दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. खूप अडचणीतून साखरभट्ट्या चालू आहेत. हा व्यवसाय कमी होतो आहे. यंदा मागणीदेखील कमी आहे.
- बंडू सिद्धे
साखरहार व्यवसायिक