- अरुण बारसकरसोलापूर : जून महिन्यापासून पावसाची संततधार व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील द्राक्षाच्या गुणवत्तेला बसला आहे. अनेक बागांना द्राक्षे लागली नाहीत, तर आलेल्या द्राक्षांची म्हणावी तशी गुणवत्ता नसल्याने निर्यातीसाठी नोंदणी झालेल्या ११ पैकी केवळ पाच जिल्ह्यांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे.यावर्षी ११ जिल्ह्यांतील ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना, बुलडाणा व बीड या जिल्ह्यांतील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. पण, प्रत्यक्ष निर्यात केवळ पाच जिल्ह्यांतून होत आहे.नोंदणी अन् निर्यात...आतापर्यंत ९०४ कंटेनरमधून १० हजार ४१६ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली आहे. निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातून ३७ हजार ५८७, सातारा ४९८, सांगली ४ हजार २०४, पुणे १,३६५, अहमदनगर ६०३, सोलापूर ५००, उस्मानाबाद ४००, लातूर १०९, जालना २०, बुलडाणा ९६ आणि बीड जिल्ह्यातील एक, अशा ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. मात्र, केवळ नाशिक १० हजार १६४ टन, सातारा ११२, सांगली १११, पुणे २५, अहमदनगर ४ मेट्रिक टन या पाच जिल्ह्यांतून द्राक्षांची निर्यात झाली आहे.२,३५० टनांची घटमागील वर्षी आतापर्यंत १२ हजार ७६६ मेट्रिक टन द्राक्षांची विविध देशांत निर्यात झाली होती. यावर्षी आतापर्यंत १० हजार ४१६ मेट्रिक टन म्हणजे मागील वर्षीपेक्षा २ हजार ३५० टन निर्यात कमी झाली आहे.
राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:08 IST