सोलापूर : 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो' असे म्हणत अल्पवयीन मुलीला मोबाईल गिफ्ट देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. अल्पवयीन पीडितेच्या आईने सोमवारी या प्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी मजनूविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ सह पॉक्सो (बाललैंगिक छळ) कायदा कलम ८, १२ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
भरत बालाजी क्यातम (वय २०, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची आई मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करते. नमूद आरोपी नेहमी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीकडे बघत असे. १३ जानेवारी रोजी त्याने पीडित मुलीला गाठून तिचा हात पकडला आणि 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याबरोबर लग्न करतो' असे म्हणाला. तिच्या हातामध्ये मोबाईल गिफ्ट म्हणून दिला आणि 'मी तुला फोन लावतो तू फोन उचलून माझ्याशी बोलत जा' यावर पीडित मुलीने नकार दिला, तरी मोबाईल देऊन निघून गेला. हा प्रकार फिर्यादीला समजला.
दरम्यान, पीडितेने झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याने नमूद आरोपीविरुद्ध सोमवारी (१९ जानेवारी) रात्री १० वाजता फिर्याद दिल्याने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदला.