वाळू उपशामुळे चंद्रभागेत पडलेल्या खडड्ड्यात उभारली गुढी! अवैध वाळू उपशाविरुध्द चंद्रभागेच्या वाळवंटात अनोखं आंदोलन
By संताजी शिंदे | Updated: April 9, 2024 19:11 IST2024-04-09T19:10:57+5:302024-04-09T19:11:14+5:30
पंढरपुरचे तत्कालीन तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी अवैध वाळु उपशाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गणेश अंकुशराव यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावुन धरली होती.

वाळू उपशामुळे चंद्रभागेत पडलेल्या खडड्ड्यात उभारली गुढी! अवैध वाळू उपशाविरुध्द चंद्रभागेच्या वाळवंटात अनोखं आंदोलन
सोलापूर : महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकार्यांनी गुढी पाडव्या निमित्त चंद्रभागेच्या वाळवंटात, अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारुन अनोखं आंदोलन केलं. यावेळी अवैध वाळु उपशाकडं दुर्लक्ष करणार्या प्रशासकीय अधिकार्यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.
पंढरपुरचे तत्कालीन तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी अवैध वाळु उपशाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गणेश अंकुशराव यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावुन धरली होती. यानंतर सदर दोन्ही अधिकार्यांच्या बदल्या झाल्या, नवीन अधिकारी आले. यावेळी बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, ‘‘आम्ही अवैध वाळु उपशाविरुध्द विविध आंदोलनं करुनही वाळु उपसा थांबत नाही, मागील प्रशासकीय अधिकार्यांच्या बदलीची मागणी केली, ते गेले, नवीन आले परंतु नवीन आलेले अधिकारी सुध्दा या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यासारखेच आहेत की काय? असा प्रश्न पडलाय.
अवैध वाळु उपशामुळे चंद्रभागेच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, चंद्रभागेच्या पात्राचा आकार बदललाय, अनेक मोठमोठ्या खड्ड्यात बुडून अनेक निष्पाप भाविकांचा बळी गेलाय, चंद्रभागेची अवस्था बकाल बनलीय. त्यामुळे या प्रश्नाकडं शासनाने गांभीर्यानं पहाणं गरजेचं आहे. आता तरी शासनाने नवीन आलेल्या प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना याची दखल घेण्याचे आदेश देऊन अवैध वाळु उपसा करणारांविरुध्द कडक आणि सातत्याने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. नवीन अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्याही बदलीची मागणी करु! असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी निलेश माने, अरविंद नाईकवाडी, महावीर अभंगराव, सुरज कांबळे, माऊलीभाऊ कोळी, प्रकाश मगर, समाधान कोळी, दत्तात्रय कांबळे, पांगळ्या सुरवसे, भैया अभंगराव, अप्पा करकमकर, अविनाश नाईकनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.