Good News; सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ) कार्यालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:45 IST2020-06-18T14:39:33+5:302020-06-18T14:45:39+5:30
एमपीएससी परीक्षा देणाºया उमेदवारांना व्हीआयपी कोट्यातून मिळणार परवाना

Good News; सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ) कार्यालय सुरू
सोलापूर : कोरोना या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी मागील अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले विजापूर रोडवरील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना या संसर्गजन्य आजाराने भारतासह महाराष्ट्रातही थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून सोलापुरातील आर.टी.ओ कार्यालय बंद ठेवण्यात आले होते़ आता अनलॉक च्या पहिल्या टप्प्यात काही नियम व अटी घालून उद्योग, कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये सोलापुरातील आरटीओ कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, लायसन्स व वाहनविषयक कार्याकरिता परिवहन सेवा या वेबसाईटवरून अॅपॉईटमेन्ट घेवूनच कामासाठी अर्ज करता येणार आहे, लर्निंग लायसन्ससाठी कॉम्पुटर टेस्ट घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे़ एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक व की बोर्ड सॅनिटायझर करून घेण्यात येणार आहे़ अर्जदारास मास्क व हॅडग्लोज घालूनच प्रवेश करता येऊ शकणार असल्याचे परिवहन विभागाने कळविले आहे.
ज्या अर्जदारांनी आर.टी.ओ. असिस्टंट इन्स्पेक्टरच्या एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरलेले असतील त्या उमेदवारांचे कच्चा व पक्या लायसन्सचे काम व्हीआयपी कोट्यातून करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाने सांगितले आहे.