गॅस कटरने बॅंक फोडणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद; सोलापूर पेालिसांची मोठी कामगिरी
By Appasaheb.patil | Updated: October 13, 2023 15:37 IST2023-10-13T15:37:19+5:302023-10-13T15:37:31+5:30
माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१ लाख १६ हजार ४४७ रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता

गॅस कटरने बॅंक फोडणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद; सोलापूर पेालिसांची मोठी कामगिरी
सोलापूर : बँकेवर दरोडा टाकण्याकरिता निघालेली आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने बँक, ज्वेलर्स शॉप, फोडणारे सराईत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ६ लाख ४२ हजार ७७० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या काळातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१ लाख १६ हजार ४४७ रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होते. याचकाळात स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील साहेबगंज व पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातून २ आरोपींना ताब्यात घेतले होते. झारखंड व नेपाळ येथील आरोपी हे लातूर येथील बँकेवर दरोडा टाकण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून ५ जणांना पकडले. त्यानंतर तिघांना पुण्यातून अटक केली. तसेच उदगीर येथून ५ जणांना अटक केली. हे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्हयातील, पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातील तसेच नेपाळ या देशातील आहेत. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी देशाच्या विविध भागात गॅस कटरच्या सहाय्याने बॅक फोडीसारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पेालिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सफौ ख्वाजा मुजावर, शिवानी घोळवे, मनोहर माने, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार बापू शिंदे, आबा मुंडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, सलिम बागवान, मोहन मनसावाले, विजय भरले, रवि माने, पोना धनराज गायकवाड, चालक समीर शेख, पोशि अजय वाघमारे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, दिलीप थोरात, युसुफ पठाण, अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे यांनी बजावली आहे.