गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, आठवले, शिंदे उद्या सांगोल्यात
By Appasaheb.patil | Updated: August 11, 2023 17:48 IST2023-08-11T17:47:57+5:302023-08-11T17:48:32+5:30
डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे

गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, आठवले, शिंदे उद्या सांगोल्यात
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी पणन व रोजगार हमी योजना मंत्री स्वर्गीय माजी आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख यांचे स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा रविवार १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंतराव पाटील, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे -पाटील, राष्ट्रवादी (पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी सभापती आ. रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे कार्यक्रम होणार आहे.
या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ नेते पोपटराव देशमुख, संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, दीपक खटकाळे अशोकराव शिंदे, प्राचार्य सिकंदर मुलाणी, प्राचार्य आदलिंगे ,अवधूत कुमठेकर, उद्योगपती उल्हास धायगुडे, डॉ. बाळकृष्ण जगताप, प्रशांत वलेकर, हनुमंत कोळवले, बाळकृष्ण कोकरे उपस्थित होते.