विधिमंडळाच्या परिसरात स्व. गणपतराव देशमुखांचे स्मारक; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
By Appasaheb.patil | Updated: August 13, 2023 20:40 IST2023-08-13T20:40:24+5:302023-08-13T20:40:34+5:30
सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते.

विधिमंडळाच्या परिसरात स्व. गणपतराव देशमुखांचे स्मारक; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
सोलापूर: स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच स्व. गणपतराव देशमुख यांचे लोकांना दिसेल असे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी , कामगार यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले सामन्याच्या उत्थानासाठी सातत्याने ते जीवनभर झटत होते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते, त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले, चे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी सांगितले. शेतकरी कामगार व वंचित घटकाबद्दल सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारे गणपतराव देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे ही कार्यपद्धती त्यांनी या भागातील लोकांच्या अंगी रुजवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.