सोलापूरात घटस्फोटित, विधवांच्या मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण, शहरातील २० शाळांसाठी भरता येईल अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:09 IST2018-01-23T14:07:56+5:302018-01-23T14:09:08+5:30
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

सोलापूरात घटस्फोटित, विधवांच्या मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण, शहरातील २० शाळांसाठी भरता येईल अर्ज
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच या शाळांमध्ये घटस्फोटित व न्यायप्रविष्ट प्रकरणातील महिला, विधवांची बालके व अनाथ मुलांनाही या जागेवर अर्ज करता येणार असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी दिली.
आरटीई कोट्यासाठी १ ते २0 फेब्रुवारी या कालावधीत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शिक्षण मंडळ व शाळांच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी या कोट्यात शहरात ६४0 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४१९ जागा भरण्यात आल्या. यंदा जागा वाढण्याची शक्यता आहे. अद्याप शाळांची नोंदणी सुरू आहे. आॅनलाईन अर्ज भरताना पालकांना एकाचवेळी १0 शाळा निवडता येणार आहेत.
आॅनलाईन प्रवेशाची सोडत तीन टप्प्यात होईल. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थी, दुसºया टप्प्यात १ ते ३ किलोमीटर परिसरातील विद्यार्थी आणि तिसºया टप्प्यात ३ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरातील विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. या कोट्यात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्राथमिकसाठी सन २0१५-१६ साठी १३ हजार २३0 इतकी फी निश्चित करण्यात आली होती तर सन २0१६-१७ साठी १७ हजार ६७0 इतकी फी निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जादा फी शाळांना घेता येणार नाही. या कोट्यासाठी शाळांनी आॅनलाईन नोंदणी २७ फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे.
-------------------------
या आहेत पात्र शाळा...
- राज मेमोरियल स्कूल, केकडेनगर व जुनी मिल कंपाऊंड, नागेश करजगी आॅर्किड स्कूल, गांधी नाथा रंगजी, सहस्रार्जुन, व्हॅलेंटाईन, ज्ञानप्रबोधिनी, विद्या इंग्लिश, नवजीवन, पोलीस पब्लिक, सुरवसे इंग्लिश, श्री. सुशीलकुमार शिंदे स्कूल, इंडियन मॉडेल, मॉडेल पब्लिक, इंडिय मॉडेल सीबीएसई, युनिक इंग्लिश, बटरफ्लॉय, पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश, गुड शेफर्ड व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. अडचणीबाबत पालकांनी कार्यालयातील पर्यवेक्षक सुरेश कासार, वरिष्ठ लिपिक प्रभावती कासार यांच्याशी संपर्क साधावा.