जिल्ह्यात चारशे टन दूध भुकटी पडून

By Admin | Updated: November 30, 2014 22:16 IST2014-11-30T22:16:26+5:302014-11-30T22:16:26+5:30

मागणी नाही : दर घसरल्याने दूध पावडर निर्मिती बंद, अतिरिक्त दुधाच्या समस्येने गणित बिघडले

Fourteen tons of milk in the district fell into the powder | जिल्ह्यात चारशे टन दूध भुकटी पडून

जिल्ह्यात चारशे टन दूध भुकटी पडून

सदानंद औंधे- मिरज -दूध पावडरला मागणी नसल्याने जिल्ह्यात सुमारे ४०० टन दूध भुकटीचा साठा पडून आहे. दर घसरल्याने दूध पावडरचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गतवर्षी २८० रुपये प्रतिकिलो असलेली दूध पावडरची किंमत देशाअंतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली आहे. दूध भुकटीचा दर १८० रुपये प्रतिकिलो झाल्याने उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दूध डेअऱ्या अडचणीत आल्या आहेत. दुधाचा खरेदी दर महाग असताना पावडरचे दर उतरल्याने उत्पादन बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मिरजेच्या शासकीय दूध योजनेसह पालीवाल व चितळे डेअरीकडे दूध पावडर तयार करण्याची यंत्रणा आहे. जिल्ह्यात दरमहा पाचशे टन दूध पावडरचे उत्पादन होते; मात्र मागणी नसल्याने जिल्ह्यात सुमारे ४०० टन दूध भुकटीचा साठा शिल्लक असल्याचे शासकीय दूध योजनेचे महाव्यवस्थापक गजानन तावडे यांनी सांगितले. आॅक्टोबर ते मार्च हा जनावरांचा पुष्टकाळ किंवा दूध उत्पादनासाठी सुकाळ मानला जातो. मात्र दूध भुकटी निर्मिती थांबल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दरमहा १५ लाख लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी मोठ्याप्रमाणात दूध भुकटीसाठी वापर होतो. गतवर्षी दूध पावडरचे दर सर्वाधिक असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. मात्र मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने दर उतरले आहेत. दुधाच्या उत्पादनात फार मोठी वाढ झालेली नाही. मात्र भुकटीच्या उत्पादन वाढीमुळे व मागणी कमी असल्याने गणित बिघडले आहे.

...तर मिरजेची डेअरी सुरू होऊ शकतेमराठवाड्यात खासगी व सहकारी दूध संघ नसल्याने अतिरिक्त दूध शासकीय योजनेकडे जमा होते; मात्र तेथील अतिरिक्त दुधावर अवलंबून असलेली मिरजेची शासकीय दूध योजना दीड वर्षे बंद आहे. मराठवाड्यातील अतिरिक्त दूध मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत आणून दूध भुकटीची निर्मिती करण्यात येते. मात्र तेथील सध्याचा दुष्काळ व त्यापूर्वीही दूध उत्पादनात घट झाल्याने मिरजेची शासकीय दूध डेअरी मे १३ पासून बंद पडली आहे. आॅक्टोबर ते मार्च हा दुधाचा पुष्टकाळ सुरू झाला तरी, मिरजेच्या दूध डेअरीत एकही लिटर दूध आलेले नाही. मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील अतिरिक्त दूध मुंबईच्या डेअरीकडे पाठविण्यात येत असल्याने दुधाअभावी मिरजेची शासकीय डेअरी बंद आहे. मात्र सध्या अतिरिक्त होणारे दूध खरेदी करून दूध भुकटी निर्मितीचा शासन पातळीवर निर्णय झाल्यास मिरजेची शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.


मिठाई, चॉकलेट, बिस्कीट, गुलाबजामून यासह विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी दूध पावडरचा वापर करण्यात येतो. त्यासाठी गाईच्या दुधाच्या मलईविरहीत दूध भुकटीचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. महानंदने दौंडजवळ वरवंड येथे दररोज ३० टन दूध भुकटी निर्मिती प्रकल्प उभारला आहे. म्हैशीच्या दुधाला बाजारात मोठी मागणी असल्याने गाईच्या दुधापासून दूध भुकटी, लोणी, तूप या उपपदार्थांची निर्मिती करण्यात येते. उत्पादन अधिक व मागणीअभावी दर उतरल्याने दूध भुकटीची निर्मिती सध्या अडचणीची ठरत असल्याचे चित्र आहे.


दूध भुकटीचे दर उतरल्याने अडचणीत आलेल्या दूध संघांना राज्य शासनाने मदत करावी, यासाठी राज्य दूध संघ दूध बंद आंदोलन करणार आहे. शासनाने अतिरिक्त दूध खरेदी करून शासकीय दूध योजनेसह राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध पावडर प्रकल्प भाड्याने घेऊन दूध पावडरची निर्मिती करावी अन्यथा राज्यातील दूध व्यवसायास मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Fourteen tons of milk in the district fell into the powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.