उत्तराखंडच्या दुर्घटनेत सोलापूरचे चार भाविक अडकले; कुटुंबाला लागली चिंता, प्रशासन मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:33 IST2025-08-06T13:33:15+5:302025-08-06T13:33:43+5:30
सध्या पुरात अडकलेल्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चारही कुटुंबियांना मोठी भिती वाटत असून ते सर्वजण काळजीत पडले आहेत.

उत्तराखंडच्या दुर्घटनेत सोलापूरचे चार भाविक अडकले; कुटुंबाला लागली चिंता, प्रशासन मदतीला धावले
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे, ज्यामध्ये अनेक घरं, दुकानं, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत सोलापुरातील चार भाविक अडकल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी व मल्हारी धोत्रे अशी चार भाविकांची नावे आहेत. हे भाविक हरिव्दार येथे दर्शनासाठी गेले होते. उत्तराखंडमधील ०८ टीए ५६७२ या क्रमांकाच्या गाडीतून त्यांनी प्रवास केला. या चार भाविकांचे अंतिम लोकेशन हे गंगोत्री पार्किंग दाखविण्यात आले असून ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांचा कुटुंबियांशी संवाद झाला होता अशी माहिती आपतकालीन यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. सध्या पुरात अडकलेल्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चारही कुटुंबियांना मोठी भिती वाटत असून ते सर्वजण काळजीत पडले आहेत.
दरम्यान, बचाव कार्यासाठी उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही सांगण्यात आले.