चिंचोली एमआयडीसीमधील फुड्स फॅक्टरीला लागली आग; कोट्यावधीचे चॉकलेट जळून खाक
By Appasaheb.patil | Updated: May 21, 2023 18:37 IST2023-05-21T18:36:47+5:302023-05-21T18:37:54+5:30
या आगीत कंपनीचे ९० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चिंचोली एमआयडीसीमधील फुड्स फॅक्टरीला लागली आग; कोट्यावधीचे चॉकलेट जळून खाक
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चिंचोली एमआयडीसीमधील डीएनके फुड्स फॅक्टरीला रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कंपनीचे ९० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चिंचोळी एमआयडीसीमधील चॉकलेट बनविणारी डीएनके फुड्स नावाची कंपनी आहे. या कंपनीला रविवारी दुपारी अचानक आग लागली. बघता बघता आग मोठया प्रमाणात भडकली अन् धुराचे लोळ मोठया प्रमाणात पसरले. या घटनेची माहिती मिळताच चिंचोळी एमआयडीसीबरोबरच सोलापूर महानगरपालिकेतील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत आग अद्याप आटोक्यात आली नव्हती. एमआयडीसीमधील शेकडो कर्मचारी यांनी आगीची घटना पाहण्यासाठी कंपनी परिसरात मोठी गर्दी केली होती. या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सांगण्यात आला.