पंढरपुरात प्रथमच कमळ खुलले, राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 07:11 AM2021-05-03T07:11:53+5:302021-05-03T07:12:48+5:30

भाजपच्या समाधान आवताडेंचा ३,७३३ मतांनी विजय, भगीरथ भालकेंचा पराभव

For the first time in Pandharpur, the efforts of the NCP failed by election | पंढरपुरात प्रथमच कमळ खुलले, राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले

पंढरपुरात प्रथमच कमळ खुलले, राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले

Next
ठळक मुद्देपंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजप-सेनेची युती असल्यापासून या ठिकाणी त्यांचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. पण यावेळी  कमळ फुलले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर :  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून  विजयी झाले.  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. 
 राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र  भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.

१९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, भाजपचे आवताडे व महाविकास आघाडीचे भालके या दोघांमध्येच लढत झाली. आवताडेंना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली, तर  भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. आवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे हे २,९५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या १,६०७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिल्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनाही अवघ्या १,०२७ मतांवर समाधान मानावे लागले. सेलिब्रिटी उमेदवार अभिजित बिचकुले निवडणूक रिंगणात होते. त्यांना केवळ १३७ मते मिळाली. 

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजप-सेनेची युती असल्यापासून या ठिकाणी त्यांचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. पण यावेळी  कमळ फुलले आहे. 

राष्ट्रवादीच्या पराभवाची ही आहेत कारणे 
राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले.

Web Title: For the first time in Pandharpur, the efforts of the NCP failed by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.