सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
"माढा तालुक्यातील कुर्डू गावात एक महिला आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते. अजित पवारांचे कार्यकर्ते वेढा टाकतात आणि अजितदादांना फोन करतात. यावेळी अजित पवार बोलतात तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करेन. म्हणजे एका बाजूने लाडकी बहीण योजना आणता दुसरीकडे आपल्या मुलीच्या वयासारख्या असणाऱ्या महिला अधिकाऱ्याला दम दिला जातो, असा आरोप खुपसे यांनी केला.
त्या महिला अधिकाऱ्याला चक्कर येते. प्रांत आणि तहसिलदारांच्या अंगावर लोक जातात. तलाठ्याला मारहाण होते. अजित पवारांचा फोन झाल्यानंतर त्यांना तिथून पळवण्यात येते. पण, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बीडचे वातावरण शांत करायला तुम्ही तिकडे पालकमंत्री झाला पण सोलापुरचे वातावरण विचित्र झाले आहे, अशी टीका अतुल खुपसे यांनी केली.
अतुल खुपसे म्हणाले, आयपीएस अधिकाऱ्यांना जर काम करता येत नसेल, स्पिकर फोन करुन मानहानी होत असेल तर येणाऱ्या आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा. लाडक्या बहीणांची माफी मागावी. नाहीतर आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा अतुल खुपसे यांनी दिला.