मरण्यापेक्षा अत्यसंस्काराला घाबरतात; जिल्ह्यातील ८९गावातील नागरिक स्मशानभूमी नसल्याने अडचण
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 17, 2023 14:13 IST2023-06-17T14:08:32+5:302023-06-17T14:13:04+5:30
जागा व रस्त्याचा नेहमीचाच वाद

मरण्यापेक्षा अत्यसंस्काराला घाबरतात; जिल्ह्यातील ८९गावातील नागरिक स्मशानभूमी नसल्याने अडचण
सोलापूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही जिल्ह्यातील ८९ गावात स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीसाठी जागा नसणे, जाण्यासाठी रस्ता नसणे तसेच गावातील गटामधील अशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक हे मृत्यूपेक्षा अंत्यसंस्कारालाच घाबरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न उद्भवतो. अनेकदा स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसतो. त्यामुळे गावात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते. त्याचे रूपांतर जातीय तणावात देखील होते. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त असलेला निधी वेळेत खर्च करणे आवश्यक आहे. स्मशानभूमीसाठी आवश्यक निधीची तरतूद करुन प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, जागेचा प्रश्नच मिटत नसल्याने प्राप्त असलेला निधीही अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहिती मागविली
जिल्ह्यातील ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावांसोबत जिल्ह्यातील सर्वच गावातील स्मशानभूमींची माहिती जिल्हा प्रशासनाने मागविली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माढा या तालुक्यात गावात सर्वात जास्त स्मशानभूमीच्या अडचणी आहेत.