बाप रे...; सोलापुरी चादरीच्या उत्पादनात झाली ९० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 03:55 PM2019-11-02T15:55:55+5:302019-11-02T15:57:06+5:30

चादरीला बाजारातून झाला उठाव कमी; यंत्रमागधारक संघाची माहिती

Father Ray ...; Solapuri sheet production declined by 19 percent | बाप रे...; सोलापुरी चादरीच्या उत्पादनात झाली ९० टक्के घट

बाप रे...; सोलापुरी चादरीच्या उत्पादनात झाली ९० टक्के घट

Next
ठळक मुद्देबाजारात स्पर्धा वाढली, स्पर्धेत दराची चढाओढ होत राहिली, यात सोलापूरचे उद्योजक मागे पडलेविशेष म्हणजे चादरींचे उत्पादन करणारे कुशल कामगारदेखील आता बोटांवर मोजण्याइतकेच राहिलेतसोलापुरातील बहुतांश यंत्रमाग कारखान्यात जाऊन फेरफटका मारल्यानंतर चादरींची सत्य स्थिती समोर आली

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : सोलापुरी चादरीची लोकप्रियता आणि वैभव कमी होत चालला आहे़ यास अनेक कारणे आहेत़ बाजारात सोलापुरी चादरीला अनेक पर्याय आल्याने बहुपयोगी सोलापुरी चादरीला बाजारातून उठाव कमी झाला़ त्यामुळे चादरीचे उत्पादन ९० टक्क्यांपर्यंत घटले आहे, अशी माहिती यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी ‘लोकमत’ला दिली.

परप्रांतातील यंत्रमाग उद्योजक सोलापूरच्या नावाने चादरी विकताहेत. पानिपतला समांतर चादरी व्यवसाय उभा राहिला. सोलापूरच्या तुलनेत पानिपत आणि दक्षिणेकडील शेजारील राज्यात आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले. सोलापुरातील उद्योजक पारंपरिक यंत्रमागाला चिकटून राहिले. उत्पादनात नावीन्यता आहे, या नावीन्यात सातत्य ठेवले नाही़ गुणवत्तादेखील कमी होत गेली़ बाजारात स्पर्धा वाढली़ स्पर्धेत दराची चढाओढ होत राहिली़ यात सोलापूरचे उद्योजक मागे पडले़ वजनदार आणि टिकाऊ चादरींचे दिवस फिरले़ मागील दहा वर्षांत चादरींचे उत्पादन तब्बल ९० टक्क्यांनी कमी झाले़ विशेष म्हणजे चादरींचे उत्पादन करणारे कुशल कामगारदेखील आता बोटांवर मोजण्याइतकेच राहिलेत. सोलापुरातील बहुतांश यंत्रमाग कारखान्यात जाऊन फेरफटका मारल्यानंतर चादरींची सत्य स्थिती समोर आली़ सोलापुरी चादरीला सध्या मरणकळा येताहेत़ चादरीची ऊब आणि सातासमुद्र्रापलीकडची कीर्ती संकटात सापडली आहे़

आकडे बोलतात...
- पूर्वी चादरींचे उत्पादन घेणाºया यंत्रमागधारकांची संख्या ३०० च्या आसपास होती़ आता ही संख्या ४० ते ५०वर आली आहे़ पूर्वी ४ हजार यंत्रमागावर चादरींचे उत्पादन होत असे़ आता ही संख्या फक्त ८०० वर आली आहे़ तसेच पूर्वी रोज बारा ते पंधरा हजार चादरींचे उत्पादन होत असे़ आता २ ते ३ हजार चादरी रोज तयार होतात़ पूर्वी कामगारांची संख्या साडेतीन हजारांवर होती़ आता फक्त पाचशे कामगार उरले आहेत़ बहुतांश कामगार हे टॉवेलकडे वळाले आहेत़ 

लोकांची जीवनशैली बदलली़ पूर्वी चादरींचा बहुतांशी वापर होत होता़ चटई, पडदा, बेडशीट तसेच पांघरण्यासाठी चादरींचा वापर होत असे़ आता बाजारात हलक्या वजनाच्या, पातळ अन् आकर्षक अशा चटई, पडदे आणि बेडशीट आल्याने सोलापुरी चादरीला पर्याय निर्माण झाला़ बाजारात प्रिंटेड बेडशीट, पडदे आणि चटई आले आहेत़ या धुवायला आणि प्रवासात कुठेही सहज नेता येतील, अशा सोईच्या आहेत़ सोलापुरी चादरींची बहुपयोगिता थांबली़ त्यामुळे वजनदार सोलापूरची चादर मागे पडली.
-राजेश गोसकी,
अध्यक्ष- टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

सोलापुरी ब्रँडचे बनावट उत्पादन
- सोलापुरी चादरीला समोर ठेवून पानिपत तसेच दक्षिण प्रांतातील यंत्रमाग उद्योजक चादरींचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली़ त्यांनी लवकर आधुनिकीकरण स्वीकारले़ चादरीचे वजन घटवले़ जाडी पातळ केली़ आकर्षक अािण पातळ बनवून त्याचे बाजारात मार्केटिंग केले़ प्रवासात चादर सहज वापरता येईल, अशादृष्टीने चादरी बनवल्या़ पातळ आणि कमी वजनाच्या चादरी लोकांच्या पसंतीस उतरू लागल्यात़पानिपतच्या चादरीत सिंथेटिक यार्नचा वापर अधिक होतो़याचे दर खूप कमी आहे़ यात पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी आहे़ त्यामुळे सहज धुलाई करता येते़ तसेच या चादरींच्या किमती सोलापूरच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी असते़ याउपर बाहेरच्या काही उद्योजकांनी सोलापुरी ब्रँडचे लेबल लावून चादरींची विक्री करू लागलेत़ सोलापुरी ब्रँडचे बनावट उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ याचा फटका येथील उद्योजकांना बसतोय़

येथील उद्योजकांनी कुठे मार खाल्ला
- सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी आधुनिकीकरण स्वीकारले नाही़ चादरीच्या नावीन्यात सातत्य ठेवले नाही़ सुताच्या दरात वारंवार चढउतार होत असल्याने किमती अस्थिर राहिल्या़ सोलापुरी चादर अधिक टिकाऊ आणि वजनदार असल्याने त्याचा वापर दीर्घकाळ चालतो़ त्यामुळे खरेदीला येणाºया ग्राहकांची संख्या मर्यादित राहू लागली़ स्पर्धेतील आव्हाने येथील उत्पादकांनी ओळखली नाहीत़ पर्यायी बाजारपेठांमध्ये मार्केटिंग करताना कमी पडले़ सोलापुरी चादरीला जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात जीआय रजिस्ट्रेशन मिळाले, पण याचे मार्केटिंग झालेले नाही़ बहुतांश उत्पादक टॉवेल्स उत्पादनात शिरल्याने चादरींची वाढ थांबली़ कामगारांची दुसरी पिढी टॉवेलकडे आकर्षित झाली़ त्यामुळे नवीन चादरीचे कुशल कारागीर तयार झालेच नाहीत़

मार्केटिंगची गरज
- टॉवेल आणि चादरीच्या उत्पादनात नावलौकिक मिळवलेल्या राजश्री टेक्स्टाईलचे मालक गोविंद बुरा यांनी सांगितले, तेलंगणा प्रांतातील सिरसुला या ठिकाणी टेक्स्टाईलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते़ तेलंगणा सरकारने संपूर्ण राज्याचे लक्ष सिरसुलावर केंद्रित करून तेथील उत्पादकांना अनेक सोयीसुविधा आणि योजना दिल्या़ तसेच सिरसुलाचे मार्केटिंग स्वत: तेलंगणा सरकार करते़ सोलापूरचे देखील असे व्हावे़ सोलापुरी चादरीकरिता महाराष्ट्र शासनाकडून मार्केटिंग व्हावे.

भविष्यात चित्र बदलेल- गड्डम
- सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणतात, पूर्वी श्रीलंका, बांगलादेश तसेच साऊथ आफ्रिका अशा मागासलेल्या देशांतून सोलापुरी चादरीला प्रचंड मागणी होती़ आता ही मागणी कमी झाली़ तसेच देशातील मागणी कमी झाली़ सोलापुरी चादरीला अनेक पर्याय निर्माण झाले़ स्पर्धक तयार झाले़ येथील बहुतांश लोक टॉवेल्सच्या उत्पादनाकडे वळाले़ त्यामुळे चादरीकडे दुर्लक्ष झाले़ 

Web Title: Father Ray ...; Solapuri sheet production declined by 19 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.