Fastag bound to four-wheeler vehicles on national highways from 1st December | राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक
राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक

सोलापूर : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवरील रांगांमध्ये अडकून राहावे लागणार नाही. मात्र त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना फास्टॅग असणे बंधनकारक आहे. महामार्गांवरील टोल नाक्यांवर एक डिसेंबर २०१९ पासून टोलची रक्कम रोखीने स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे चार चाकी व मोठ्या वाहनधारकांनी फास्टॅग बसवून घ्यावेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरू केली आहे. मंत्रालयाने १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख रकमेने टोल भरता येणार नाही आणि वाहनचालकांनी फास्टॅग यंत्रणेचा वापर करावा, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे कदम यांनी नमूद केले.

फास्टॅग यंत्रणा सर्व पथकर नाक्यांवर उपलब्ध असून, स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीएफसी आदी बँकांच्या शाखांमध्येही ते विकत घेता येतील. याशिवाय आॅनलाइन परचेस पोर्टलवर ते मिळतील आणि गुगल प्ले स्टोअरवरही फास्टॅग अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. फास्टॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप असून, ती वाहनांच्या समोरील भागात लावायची असते. विविध रकमांची चिप विकत घेता येते तसेच ती बँक अकाउंटला जोडता येते. फास्टॅग असलेले वाहन टोल नाक्यावरून जाताच तेथील टोलची रक्कम आपोआप त्यातून जमा केली जाते. सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगसाठी पथकर उपकरणे आहेत. चिप स्कॅन होताच टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि कोणत्याही अडथळ्याविना वाहन पुढे जाऊ शकेल.

फास्टॅगचे फायदे...
फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. अनेक टोल नाक्यांवर बऱ्याचदा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पुढे जाण्यास विलंब तर होतोच, पण इंधनही वाया जाते.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया आणि कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटने अभ्यासातून आणलेल्या फास्टॅगमुळे देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची वर्षाला बचत होईल, असे म्हटले आहे. शिवाय प्रदूषणही कमी होईल.

Web Title: Fastag bound to four-wheeler vehicles on national highways from 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.