शेतातून गावात परतताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: July 3, 2023 17:37 IST2023-07-03T16:53:50+5:302023-07-03T17:37:14+5:30
बीबी दारफळ येथील वस्तीजवळील घटना

शेतातून गावात परतताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू
सोलापूर - शेतातल्या वस्तीवरुन गावाकडे परतताना तुटलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून शेतकरी अडकून पडला आणि शॉक बसून बेशुद्ध झाला. सोमवारी (३ जुलै) सहाच्या पूर्वी ही घटना उघडकीस आली. बीबी दारफळ येथे गणेश चौरे यांच्या वाड्यालगत ही घटना घडली.
पुरुषोत्तम तुळशीराम चौरे (वय- ४८) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे शेताच्या निमित्ताने अनेकांची शेतामध्ये वस्ती आहे. सोमवारी यातील मयत शेतकरी पुरुषोत्तम चौरे हे शेतातून गावाकडे येत होते. पहाटेच्या सुमारास गणेश लक्ष्मण चौरे यांच्या वाड्यालगत इलेक्ट्रिक वायर तुटलेल्या अवस्थेत असताना त्याचा स्पर्श पुरुषोत्तम यांना झाल्याने शाॅक लागून ते जागेवरच कोसळले. सकाळी सहाच्या पूर्वी आजूबाजूच्या लोकांना बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने त्यांचा भाऊ धनाजी चौरे यांनी सकाळी ८:३० वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.