सोलापुरात खंडणीखोर अजय गायकवाड स्थानबद्ध
By विलास जळकोटकर | Updated: March 25, 2024 18:15 IST2024-03-25T18:14:57+5:302024-03-25T18:15:10+5:30
येरवड्यात रवानगी : निवडणुकीच्या तोंडावर कारवाई

सोलापुरात खंडणीखोर अजय गायकवाड स्थानबद्ध
सोलापूर : दशहत पसरवून खंडणी उकळणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्या अजय राजू गायकवाड या सराईत गुन्हेगारावर सोमवारी एमपीडीए अन्वये स्थानबद्ध कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी बजावली. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुरक्षेसाठी उपद्रवी ठरणाऱ्या रेकार्डवरील आरोपींवर कठोर कारवाईचे सत्र पोलिसांनी सुरु केले आहे. त्याचा भाग म्हणून अजय गायकवाड (वय- ४३, न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) याच्यावर स्थानबद्ध कारवाई करण्यात आली.
त्याविरुद्ध सलगवस्ती, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्राचा वापर करुन खंडणी उकळणे, महिलांवर अत्याचार, ,लैंगिक छळ, ॲट्रॉसिटी, प्रतिबंध आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या या कृत्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यामुळे त्याच्यावर २०२० मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. यावरही त्याच्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळ्य त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई करण्यात आली.