सर्वकाही आलबेल होईल !

By Admin | Updated: August 5, 2014 01:32 IST2014-08-05T01:32:12+5:302014-08-05T01:32:12+5:30

भाजपा निरीक्षकांचा दावा : समन्वयाचा अभाव; ‘देशमुख हटाव’वर विरोधक ठाम

Everything will be awesome! | सर्वकाही आलबेल होईल !

सर्वकाही आलबेल होईल !


सोलापूर : शहर भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची धुसफुस नसून, समन्वयाच्या अभावामुळे किरकोळ नाराजी आहे; येत्या आठ दिवसात सर्वकाही आलबेल होईल, असा दावा पक्षाचे प्रदेश निरीक्षक गोविंद केंद्रे आणि सुनील बढे यांनी आज केला. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गटाने शहराध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘देशमुख हटाव’ या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
भाजपातील असंतुष्ट नगरसेवक आणि काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांच्या विरोधात ‘भाजप बचाव निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करून देशमुखांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष केंद्रे आणि प्रदेश सचिव बढे हे आज सोलापुरात आले. त्यांनी शहर कार्यालयात संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रे म्हणाले की, पक्षामधील समन्वयाच्या अभावामुळे थोडेसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती कोणत्याही पक्षात आणि शहरात असते. आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून, कोअर समितीला अहवाल देणार आहोत. फारशी गंभीर स्थिती नसल्यामुळे आठ दिवसात नाराजी दूर होईल. भाजपमध्ये नाराज असलेले पक्षाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांची निष्ठा भाजपवरच आहे, असे ते म्हणाले.
पक्षातील नाराज गटाचे नगरसेवक सुरेश पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानात आमदार म्हणून देशमुख यांचा सहभाग नगण्य होता. शिवाय विकास कामांसाठी शासनाचा निधी आणला नाही. पक्षाध्यक्ष म्हणून बैठकही घेतली नाही. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावरून हटवावे आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी. आमची हीच भूमिका आम्ही निरीक्षकांसमोर मांडली. आमदार देशमुख यांचीही बाजू काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मांडली. देशमुख यांची स्वीकारार्हता मोठी असून, भाजपच्या मूळ मतदारांसह लिंगायत, तेलुगू आणि मुस्लीम समाजाचा देशमुखांना नेहमीच पाठिंबा असतो. शिवाय कार्यकर्त्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून येतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तेच योग्य उमेदवार आहेत, असे निरीक्षकांसमोर सांगण्यात आले.
-----------------------------
विरोध आहे; पण बंड नाही !
आमदार देशमुख यांच्या उमेदवारीला त्यांच्यावर नाराज असलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे; पण बंडखोरी करण्याची त्यांची भूमिका नाही. प्रदेश संघटनेकडून जो उमेदवार शहर उत्तर मतदारसंघासाठी निश्चित होईल. त्याच्यासाठीच काम करण्याची भूमिका नाराजांनी व्यक्त केल्याचा दावा निरीक्षक गोविंद केंद्रे यांनी केला.
इच्छुकांच्या मुलाखती...
प्रदेश निरीक्षक केंद्रे आणि बढे यांनी सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शिवाय शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. मध्य आणि दक्षिण मतदारसंघ सेनेकडून घ्यावेत, अशी त्यांची भूमिका असून, ती आपण कोअर समितीत मांडणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Everything will be awesome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.