Entrance to the motorists in Solapur, seeing no-entry board | नो-एंट्रीचा फलक पाहूनही सोलापुरातील वाहनधारकांची घुसखोरी
नो-एंट्रीचा फलक पाहूनही सोलापुरातील वाहनधारकांची घुसखोरी

ठळक मुद्देवाहतूक सुलभ अन् सुकर व्हावं म्हणून केलेले नियम वाहनधारकच मोडत असतीलकेवळ नियमच नव्हे तर नियमभंग केल्यावर पोलीस अडवत असतीलशहराचा विस्तार झपाट्याने झाला, त्या मानाने पोलिसांची संख्या वाढण्याऐवजी स्थिर राहिली

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : वाहतूक सुलभ अन् सुकर व्हावं म्हणून केलेले नियम वाहनधारकच मोडत असतील... केवळ नियमच नव्हे तर नियमभंग केल्यावर पोलीस अडवत असतील तर त्यांना चकवा देत आपली वाहने नो-एंट्रीमधून दामटून नेण्याचा प्रताप मंगळवारी पाहावयास मिळाला. त्यामुळे शहरातील सर्वच एकेरी मार्ग चक्क दुहेरी बनल्याचे चित्र मंगळवारी दुपारी साडेबारा ते दोन या तासाभराच्या ‘आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग’ करताना ‘लोकमत’ चमूच्या कॅमेºयात कैद झाले.

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील म्हणतात, ‘आहे त्या तोकड्या कर्मचाºयांवर आम्ही नो-एंट्रीत जाणाºयांवर कारवाई करतोच. मात्र, शहरवासीय जागरुक कधी होणार? दुपारी साडेबारा वाजता लोकमत चमू शिवाजी चौक परिसरात पोहोचला. चौपाड, काळी मशिदीमार्गे शिवाजी चौक हा रस्ता एकेरी आहे. चौपाडहून वाहनधारकांना या मार्गावरुन चौकात येता येत नाही. परंतु एकेरी मार्गाचा कुठेच फलक दिसून आला नाही. या मार्गावरील काही व्यापारी आणि रहिवाशांकडे विचारणा केली असता ‘साहेब, पूर्वी एकेरी मार्ग होता. आता कुठे बोर्ड नाही. बहुतेक दुहेरी मार्ग झाला असेल’, असे बुचकळ्यात टाकणारे उत्तर ऐकावयास मिळाले. या मार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणारे दुचाकीस्वार, रिक्षावाले कॅमेºयात बंदिस्त झाले. 

दुपारी पाऊण वाजता चमू पोहोचला नवीपेठेतील पारस इस्टेटजवळ. पारस इस्टेटपासून पुढे मेकॅनिकी चौकापर्यंतचा मार्ग एकेरी पाहावयास मिळाला ते वाहतूक शाखेने दर्शनी भागात लावलेल्या ‘नो-एंट्री’ फलकामुळे. कॉर्नरवर थांबलेल्या एका रिक्षाचालकास ‘हा मार्ग एकेरी आहे का?’ असा प्रश्न केला. त्यावर त्याने ‘साहेब, सगळेच चाललेत. तुम्हीही जा ना. कोण विचारतंय?’ मार्गावरून बिनधास्त जाणारे वाहनधारक, रिक्षावाले दिसत होते; मात्र वाहतूक शाखेचा पोलीस दिसून आला नाही. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी नवीपेठमार्गे चमू राजवाडे चौकात पोहोचला. तेथील मारुती मंदिराच्या शेजारीच नो-एंट्रीचा बोर्ड दिसला.

राजवाडे चौक ते पारस इस्टेट हा एकेरी मार्ग आहे. राजवाडे चौकातून येणाºयांना चौपाडहून जावे लागते. मात्र राजवाडे चौकातून पारस इस्टेटकडे जाणारे अनेक वाहनधारक, रिक्षा अन् टेम्पोवालेही प्रखरपणे दिसून आले. या मार्गावरील अनेक व्यापाºयांना बोलते केले असता त्यांनीही नो-एंट्रीचा नियम मोडणाºयांवर कारवाई झाली पाहिजे, असा सूर आळवला. त्यानंतर ‘लोकमत’ चमू दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी माणिक चौकाच्या आधी कसबा पोलीस चौकीसमोर पोहोचला. चौकीलगतचा ‘नो-एंट्री’ बोर्ड दिसून आला. तरीही काही मिनिटांमध्ये चार-पाच रिक्षा, १० ते १२ दुचाकीस्वार आपली वाहने दामटून नेत असल्याचे चित्र चमूतील छायाचित्रकाराने आपल्या कॅमेºयात कैद केले. पुढे १ वाजून ३७ मि. ते दुपारी २ पर्यंत टिळक चौक ते फलटण गल्ली आणि मीठ गल्ली ते कुंभार वेस, मंगळवार पेठ चौकी ते मधला-मारुती या एकेरी मार्गाचीही वाट लागल्याचे दिसून आले. 

दत्त चौकाच्या चोहोबाजूने नो-एंट्री, बट् ओन्ली एंट्री 
- दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी दत्त चौकात पोहोचलो. नेहमीच गजबजलेल्या दत्त चौकाच्या चोहोबाजूने नो-एंट्री आहे. माणिक चौकातून दत्त चौकामार्गे थेट राजवाडे चौकाकडे जाता येत नाही. लक्ष्मी मंडईहून आलेल्या वाहनधारकांनाही नो-एंट्रीचा सामना करावा लागतो. या चौकाच्या भोवतालचे सर्वच एकेरी मार्ग दुहेरी बनले होते. केवळ दुचाकीस्वारच नव्हे तर रिक्षासह कार आणि मालवाहतूक गाड्याही नो-एंट्रीचा नियम मोडत असतानाचे चित्रही दिसत होते. 

पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे- मिलिंद म्हेत्रे
- ५ आॅगस्ट १९९२ रोजी सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. लगतची ११ गावे शहरात समाविष्ट झाली. त्यानंतर पाच दिवसांनंतर म्हणजे १० आॅगस्ट १९९२ रोजी पोलीस आयुक्तालय स्थापन झाले. आज २७ वर्षे पूर्ण झाली. या २७ वर्षांमध्ये शहराचा विस्तार झपाट्याने झाला. त्या मानाने पोलिसांची संख्या वाढण्याऐवजी स्थिर राहिली. पोलीस काय-काय म्हणून करतील, हा विचार प्रत्येकाने करताना ‘मी वाहतुकीचे नियम मोडणार नाही’ एवढी एकच शपथ घेतली तर वाहतूक सुरळीत अन् सुलभपणे होईल, असा विश्वास वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद म्हेत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

वाहतुकीचे नियम प्रत्येकाला लागू होतात. परंतु नियमांचे भंग करणारेच अधिक आहेत. अशा लोकांमध्ये जागरुकता येणे गरजेचे आहे. नियम मोडून आपण स्वत: ट्रॅफिक जाम करतो. त्याला पोलीस तरी काय करणार. ‘वाहतुकीचे नियम पाळू’ ही चळवळ राबवली पाहिजे.
-गौरीशंकर जेऊरे, नागरिक

नो-एंट्री आहे, हे माहीत असतानाही शहाणी माणसं बिनधास्तपणे वाहने घुसवतात. वाहतूक शाखेचा कुणी पोलीस अडवला तर उलट त्यालाच दमदाटी केली जाते. हे कुठल्या शास्त्रात बसते. सोलापूरकर वाहतुकीचे नियम पाळतात, हा संदेश राज्यातच नव्हे तर देशात गेला पाहिजे.
-योगेश निंबाळे, व्यापारी 

आम्ही तर करूच... तुम्हीही नियम पाळा : कमलाकर पाटील
- शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आमची नेहमीच धडपड असते. वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर दररोज कारवाई करत असतोच. पण शेवटी पोलीस हा एक माणूस आहे. नागरिकांनी जेणेकरून वाहनधारकांनी थोडी जागरुकता बाळगून नियम पाळले तर कोणालाच त्याचा त्रास होणार नाही. वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम तर आम्ही करूच, पण तुम्हीही नियम पाळा, असा सल्ला शहर वाहतूक शाखेच्या दक्षिण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 


Web Title: Entrance to the motorists in Solapur, seeing no-entry board
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.