नवीन वर्षात १५३ सहकारी संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:20+5:302020-12-30T04:29:20+5:30
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सांगोला तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक मतदारांचा थेट संपर्क येणाऱ्या ...

नवीन वर्षात १५३ सहकारी संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सांगोला तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक मतदारांचा थेट संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा सहकारातील निवडणुका अधिक सुटसुटीत आहेत. त्यातही आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या सांगोला तालुक्यातील १५३ सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी सहकार विभागदेखील अनुकूल आहे.
सांगोला तालुक्यातील ‘अ’ वर्गातील २, ‘ब’ वर्गातील ८०, ‘क’ वर्गातील ५३, ‘ड’ वर्गातील १८ अशा १५३ पतसंस्था, मजूर संस्था, विकास सेवा सोसायटी, नागरी बँकाच्या निवडणुका नव्या वर्षात होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली तरीही कामकाज नियमावलीनुसार संस्थेचे कामकाज सदस्यांंना विश्वासात घेऊन करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणुकांना चौथ्यांदा मुदतवाढ
कर्जमाफीच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने पहिल्यांदा निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ‘क’ मधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे १७ मार्चला पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाढविला. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविली. नंतर चौथ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ३१ डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.