भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार
By राकेश कदम | Updated: August 21, 2023 14:54 IST2023-08-21T14:53:54+5:302023-08-21T14:54:05+5:30
नागपंचमीनिमित्त सोलापुरातील नाभिक समाजाने चिमटेश्वर महाराजांची रथयात्रा काढली.

भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार
सोलापूर - फोटो काढण्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी हाणामारी झाली होती. हे प्रकरण ताजे असताना नागपंचमी निमित्त सोमवारी निघालेल्या रथयात्रेत भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासमक्ष एका माजी नगरसेवकाने भाजपच्या शहर उत्तर विधानसभा अध्यक्षाला चापट मारली. शहरातील कोॱतम चौक परिसरात हा प्रकार घडला. यामुळे मिरवणुकीतील वातावरण काही वेळ तणावपूर्ण होते.
नागपंचमीनिमित्त सोलापुरातील नाभिक समाजाने चिमटेश्वर महाराजांची रथयात्रा काढली. या मिरवणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे महेश कोठे, भाजपचे शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील, माजी नगरसेवक सुरेश पाटील सहभागी झाले होते.
मिरवणुकीत फोटो काढण्यावरून सुरेश पाटील आणि राजकुमार पाटील यांच्यात वाद झाला. या वादातून सुरेश पाटील यांनी राजकुमार पाटील यांना चापट मारली. राजकुमार पाटील आणि कार्यकर्ते सुरेश पाटलाच्या अंगावर धावले. राजकीय नेत्यांनी दोघांनाही बाजूला केले. त्यामुळे पुढील गोंधळ थांबला. या प्रकारामुळे मिरवणुकीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसून आले.