नगरसेवक विजय राऊतसह आठ जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 5, 2014 01:19 IST2014-08-05T01:19:38+5:302014-08-05T01:19:38+5:30
नागेश अक्कलकोटे खुनीहल्ला प्रकरण

नगरसेवक विजय राऊतसह आठ जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : बार्शी नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नागेश हरिभाऊ अक्कलकोटे (वय- ३६, रा. खुरपे बोळ, बार्शी) यांच्यावर झालेल्या खुनीहल्ला प्रकरणी बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय विठ्ठल राऊत, दीपक पांडुरंग राऊत यांच्यासह ८ जणांवर सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो झीरो क्रमांकाने बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
दीपक ढावारी, सोनू हजगुडे, रणजित चांदणे आणि अन्य तीन अनोळखी आरोपींची नावे आहेत. १ आॅगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजता नागेश अक्कलकोटे आणि त्यांचे मित्र पंकज तुकाराम शिंदे हे दोघे गुडे यांच्या खताच्या दुकानासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत थांबले होते. तेवढ्यात तीन मोटरसायकलींवरून विजय राऊत, दीपक राऊत, दीपक ढावारी, सोनू हजगुडे, रणजित चांदणे आणि अन्य तिघे अनोळखी तेथे आले. त्यावेळी आरोपींनी नागेश अक्कलकोटे यांना रस्ते कामाच्या दर्जासंदर्भात दिलेल्या तक्रारीचा आणि नगरसेवक दीपक राऊत यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यासाठी पाठपुरावा का केला असा जाब विचारला़ आणि त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर काठ्या आणि तलवारींनी खुनीहल्ला चढवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात अक्कलकोटे हे रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळले. अक्कलकोटे यांचा मित्र पंकज शिंदे यालाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर अक्कलकोटे यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
------------------------------------
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
जखमी अवस्थेत अक्कलकोटे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. यानुसार पोलिसांनी आरोपींवर तूर्त भादंवि कलम ३०२ लावले आहे. हा गुन्हा बार्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून, तपासाअंती बार्शी पोलिसांना कलमे लावण्याचा अधिकार असल्याचे तालुका पोलिसांनी स्पष्ट केले.