ईडी.. ईडली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:37 PM2019-09-30T14:37:32+5:302019-09-30T14:37:36+5:30

राजकीय गप्पा...

Ed .. idli ... | ईडी.. ईडली...

ईडी.. ईडली...

Next

रविंद्र देशमुख

खरं म्हणजे जगण्यासाठी आम्हाला काही कामधंदा करावा लागत नाही. घरची शेतीवाडी आहे. भाऊ लोकं ती बघतात. कधीकधी आमच्या वाटेला काम येतं, तेव्हा कारंबा रोडच्या शेतात जाऊन येतो... वर्षातून दोन-तीन वेळा शेतातलं धान्य, भाजीपाला घेऊन यार्डात जातो अन् पट्टी घेऊन येतो. एव्हडंच आमच्या वाटेला काम. त्यामुळे आमच्याकडं रिकामा वेळ बक्कळ असतो. कधीकधी दिवस कसा घालवायचा, हा प्रश्न पडतो; पण आम्ही गल्लीतले कार्यकर्ते अन् दुनियादारी करण्याची भारी हौस...निवडणुका आल्या की मात्र आमचा उत्साह डबल होतो..घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायला सदैव तयार!.. तसा आमचा कोणता पक्ष, गट नाही ओ. आधीच सांगून ठेवतो.  फकस्त मोठेपणा मिळालं की झालं. कोण आण्णा, अप्पा, दादा म्हणत पहिल्यांदा आलं की, आम्ही त्यांच्या पक्षाचे..निवडणुकीच्या काळात तर राजकीय पक्षाचे उमेदवार, वॉर्डातले मेंबर  गाठतातच..त्यामुळे दिवस पुरत नाही आम्हाला.

सकाळच्या नाष्ट्यापासून बाहेर; पण दुपारच्या जेवणाला घरी यावं लागतं, नाही तर म्हातारी ओरडते. रात्रीचं काय नसतं, ती झोपलेली असते अन् बायकोला आम्हाला काय विचारण्याची टाप नाय. रात्री कुठं बसलो तर जेवणही तिकडंच उरकलं जातं...परवाची गोष्ट सांगतो, गल्लीमंदी सकाळी दोस्तांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. आमचे मेंबर आले अन् मला गाडीवर घेऊन गेले. आण्णा, चला नाष्टा करू म्हणाले..हुश्श्य झालं. चला दिवस तरी कटेल म्हणून मेंबरच्या बुलेटवर मागच्या सीटवर नॅपकीन टाकून बसलो...काय सांगू, मेंबरनं मधला मारुती चौकात आणलं...त्यांच्या पक्षाचे काही थोराड  नेते तिथं आलते. आमची वळक करून दिली अन् चला म्हणाले.. महादेव गल्ली शेजारच्या बोळातल्या एका हॉटेलात आम्ही सगळे नाष्ट्यासाठी गेलो.

टेबलवर बसलो. आमच्याबरोबर आलेल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या चेहºयावर सारखी काळजी दिसत होती. मला वाटलं, तिकिटाच्या रेसमधील असेल. उमेदवारी मिळेल की नाही म्हणून हुरहुर लागली असेल. मी आपला कानाडोळा केला अन् नाष्टा काय येतो म्हणून वाट बघू लागलो; पण न राहून माझी नजर त्या पुढाºयाच्या चेहºयाकडेच जाऊ लागली. सारखं सारखं रुमालानं कपाळावरचा घाम पुसत होता..बिच्चारा. त्यास्नी इचारलं काय झालं नेते?; पण सांगायला तयारच नाही. तितक्यात हॉटेलातला फडकेवाला आला अन् टेबल पुसू लागला..शेजारून जाणाºया कुणाचा तरी त्याच्या हातातल्या पाण्याच्या भांड्याला धक्का लागला अन् पाणी खाली सांडलं. बाजूला उभारलेल्या एका फॅमिलीच्या अंगावर सगळं पाणी उडालं, त्योच त्या बाई  ईऽऽऽऽ म्हणून चिरकल्या..त्या बाईचं ते ‘ईऽऽऽ’ ऐकून नेत्याचा चेहरा तर आणखीनच  घामानं डबडबला...चेहरा काळजीनं जाम आवळून गेला...त्यांची ती गत पाहूनच मलाच कसंतर वाटलं. आमच्याबरोबर आलेल्या लोकास्नी बी काय झालं ते कळंना;  पण आमच्या मेंबरला ते ठाऊक होतं. त्यांनी त्या घामेजलेल्या पुढाºयाच्या हातावर हात ठेवून धीर दिल्यासारखं केलं. आता मात्र आम्हाला काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली...

काही वेळात वेटर आॅर्डर घेण्यासाठी आला अन् म्या चटकन म्हणालो, मला ईडली सांगा!..ईडलीतला ई म्हणताच त्या नेत्यानं चक्क डोक्यावरची टोपी काढली अन् चिडचिडपणा करू लागला.  माझ्यावर खेकसूनच म्हणाला, ते काय मागवू नका ओ, दुसरं काय तर घ्या!..मला आश्चर्य वाटलं..पुन्हा मेंबरंनं पुढाºयाला धीर दिला; पण माझी उत्सुकता शिगंला गेली. नाष्टा उरकून आम्ही सर्वांना राम राम करून पार्टी कार्यालयाकडं निघालो..माझी उत्सुकता ताणलेलीच होती. बुलेट थांबवून मेंबरला विचारलं, हा पुढारी इतकं काय घाबरला होता?...मेंबर सांगू लागला,अण्णा, तुम्हाला काय सांगू, यानला परवा इन्कम टॅक्सची नोटीस आलीय. काय रिटर्न, बिटर्न भरले नसतील; पण या अशिक्षित पुढाºयाला काय ठावं? त्याला वाटलं ईडीची नोटीस आलीय...पेपरलामधल्या ईडी कारवायाच्या बातम्या वाचून तर त्यो आणखी घाबरलाय...त्यामुळे ‘ई’ शब्दाचा नुसता उच्चार केला तरीही त्याला थरथरी सुटते...आता ती बाई  ईऽऽऽऽ म्हणून चिरकली की, त्यो घामानं वल्ला झाला न् आण्णा, तुम्ही तर त्याच्यासमोरच ईडली मागवलीय; मग ईडलीत ‘ई’ आलंच की. त्यामुळंच तुमच्यावर त्यो खेकसला...मेंबरचा हा खुलासा ऐकून म्या पोट धरून हसू लागलो...

Web Title: Ed .. idli ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.