संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट

By Admin | Updated: October 23, 2014 14:40 IST2014-10-23T14:40:28+5:302014-10-23T14:40:28+5:30

सध्या सुरु असलेल्या संगणकीय युगात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीपूजनाच्या परंपरेवर देखील काही प्रमाणात याचा परिणाम झाला आहे.

Due to the increasing use of computers, sales of daily commodities declined | संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट

संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट

 

 
सोलापूर : जागतिकीकरणाच्या प्रवाहात अनेक पारंपरिक कल्पना मागे पडत चालल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या संगणकीय युगात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीपूजनाच्या परंपरेवर देखील काही प्रमाणात याचा परिणाम झाला आहे. हल्ली सर्वच व्यापार्‍यांकडे संगणक असतो. साहजिकच रोजच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी 'बॅलन्स शीट'चा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे पूर्वी हमखास गरजेच्या असलेल्या रोजमेळ वह्यांचा वापर दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. 
धनत्रयोदशीला कित्येक व्यापारी वर्षाचा ताळेबंद मांडण्यासाठी हमखास रोजमेळ, कीर्द, खतावणी आदी प्रकारच्या वह्या घेतात. जागतिकीकरण झाले असले तरीही अद्याप सर्वच जण मुहूर्ताची वेळ पाळून धनत्रयोदशीला वह्यांची खरेदी करतात. परंतु यंदा यामध्ये सुमारे १५ ते २0 टक्के घट झाली आहे. रोजमेळच्या वह्यांवर ताळेबंद मांडण्यापेक्षा संगणकावर हिशेब ठेवणे खूप सोपे झाले आहे. आजकाल बहुतांशी व्यापारी सर्रास संगणकाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज 'बॅलन्स शीट' भरण्याची सवय झाली आहे. काही व्यापार्‍यांनी या कामासाठी ताळेबंदाचे ज्ञान असलेल्या व्यक्तींची नेमणूक देखील केलेली आहे. 
संगणकीय युग असले तरीही परंपरेप्रमाणे अद्यापही बहुतांशीजण रोजमेळ वह्यांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. परंतु वह्या विक्रीत झालेली घट लक्षात घेता, दिवसेंदिवस वही विक्रीत घट होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. यंदा संगणकप्रेमी व्यापार्‍यांनी केवळ 'शास्त्र' म्हणून लक्ष्मीवही घेण्यास पसंती दिली आहे. तसेच काही आधुनिक विचारांच्या व्यापार्‍यांनी पारंपरिक वही पूजनासच फाटा दिल्याचे चित्र आहे. 
असे असले तरीही बाजारपेठेत रोजमेळ वह्या १५0 ते ६00 रुपये, लक्ष्मी वही ३0 ते १२0 रुपये, कीर्द वही १00 ते २३0 रुपये, आवक-जावक वही ९0 ते २५0 रुपये या किमतीत उपलब्ध आहेत. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापार्‍यांकडून वह्यांची विधिवत पूजा करण्यात येईल. (प्रतिनिधी) रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट झाली आहे. मात्र कीर्द वह्यांची मागणी कायम आहे. रोजमेळ लिहिणार्‍यांची संख्याही कालओघात कमी होत असल्याचे कारणही या मागे आहे. तरूण पिढीचा कल संगणकीकरणाकडे असला तरीही कच्चा हिशोब ठेवण्यासाठी रजिस्टरचा वापर बहुतेकजण करतात. शिवाय अजूनही लक्ष्मीपूजनाला मुहूर्त पाळण्यासाठी वहीची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे बहुतांशी व्यापारी बांधवांकडून वही खरेदीत खंड पडणार नाही.
- सुनील धरणे
रोजमेळ वही विक्रेते लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 
■ आज गुरुवारी लक्ष्मीपूजनादिवशी मुहूर्तावर रोजमेळ, खतावणी, कीर्द वह्यांची पूजा करण्यात येणार आहे. यासाठी लक्ष्मीपूजन मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत.
 सायंकाळी ४.३२ ते ८.४२ आणि 
रात्री ९.0१ ते उ.रा. ३. २२.

Web Title: Due to the increasing use of computers, sales of daily commodities declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.