परप्रांतीयांच्या कष्टामुळेच करमाळ्यातील केळी अरब देशात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:21 PM2020-05-16T12:21:51+5:302020-05-16T12:24:06+5:30

पश्चिम बंगालमधील तीन हजार मजुरांचा जत्था करमाळ्यात; अरब देशांमध्ये ५० ट्रक केळीची निर्यात 

Due to the hard work of foreigners, bananas from Karmalya in Arab countries ...! | परप्रांतीयांच्या कष्टामुळेच करमाळ्यातील केळी अरब देशात...!

परप्रांतीयांच्या कष्टामुळेच करमाळ्यातील केळी अरब देशात...!

Next
ठळक मुद्देपरप्रांतीय मजुरांची कामावरील निष्ठा वाखाणण्याजोगीपरप्रांतीय हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे करतातत्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची गरज नसते

करमाळा : लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून कृषी क्षेत्राला सूट दिल्यामुळे करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून दररोज अरब देशांमध्ये ५० ट्रक केळीची निर्यात होऊ लागली आहे. यासाठी जिल्ह्यात पश्चिम बंगालचा तीन हजार मजुरांचा जत्था राबराब राबतो आहे.
निर्यातक्षम केळीची गुणवत्ता राखण्यासाठी कसब या मजुरांकडे असल्यामुळे त्यांच्यावर केळी उत्पादकांची मदार आहे. मात्र या परप्रांतीय मजुरांना सरकारने गावी जाण्याची मुभा दिल्यामुळे रमजान ईदपूर्वी त्यांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. त्यांच्या जाण्याने केळीच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

 सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तालुक्यातील केळी निर्यातीला गेल्या चार  वर्षांपासून गती आली आहे. तालुक्यात आणि जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम उत्पादन होत आहे. परंतु कापणीनंतरच्या केळीची हाताळणी करताना होणाºया असंख्य चुकांमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होत होते. 

केळी कापल्यानंतर ती बॉक्समध्ये पॅकिंग होईपर्यंत केळीला कुठे बाहेरून धक्का लागला, केळी  घासली गेली तर पिकल्यानंतर केळी तिथे काळी पडते. विदेशात अशी काळी पडलेली केळी रिजेक्ट केली जाते. म्हणून निर्यातीसाठी  अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने केळीची हाताळणी करणाºया बंगाली मजुरांना प्राधान्य दिले जाते. केळीचा एक ट्रक म्हणजे सुमारे १० टन केळी कापून भरण्यासाठी साधारणत: १५ बंगाली मजुरांचे एक पथक काम करते.

परप्रांतीय मजुरांना लागली घरची ओढ
- पश्चिम बंगालमधील मालदा शहराच्या परिसरातील हे सर्व मजूर आहेत. यातील बहुतेक सर्व मजूर मुस्लीम बांधव असून, कोरोनाच्या भीतीमुळे ईदपूर्वी घरी जाण्याची बहुतेकांची इच्छा आहे. हे कामगार जानेवारीपासून किंवा त्याआधी केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात येतात. जुलैपर्यंत ते काम करतात. वर्षातील किमान ७ महिने ते महाराष्ट्रात राहतात. सध्या करमाळा तालुक्यात कंदर व माढा तालुक्यातील टेंभुर्णी या ठिकाणी बंगाली कामगारांची अनेक पथके म्हणजे तीन हजार कामगार आहेत. ईदपूर्वी निम्मे कामगार घरी गेल्यास निर्यातीचे प्रमाणही कमी झालेले असेल आणि स्थानिक मजुरांची मदत केळी व्यापाºयांना घ्यावी लागणार आहे.

कौशल्यपूर्वक कामे... 
- केळीच्या झाडावरून कापणी केलेला घड काळजीपूर्वक खांद्यावर नरम गादीवर ठेवून माल वाहतूक गाडी पर्यंत आणणे, केळीच्या खालची वाळलेली काळी फुलं काढून घडाच्या प्लास्टिक दोरीच्या साह्याने फण्या वेगवेगळ्या करणे, या फण्या आधी स्वच्छ पाण्याने आणि नंतर बुरशीनाशक पाण्याने धुणे, या फण्यांचे १३ किलो याप्रमाणे बॉक्समध्ये पॅकिंग करणे आणि शेवटी कागदी बॉक्समध्ये केळी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतील हवा काढून घेऊन बॉक्स पॅक करणे ही सर्व कामे हे कुशल मजूर उत्कृष्टपणे करताना दिसून येतात. 

पॅकिंगचा खर्च मोठा... 
- बंगालमधील हे कुशल मजूर केळी निर्यातीसाठी पॅकिंग करताना साधारणपणे तीनशे रुपये क्विंटल अशी मजुरी घेतात. ही मजुरी काहीशी जास्त वाटत असली तरी त्यामागे त्यांची मेहनत, कष्ट आणि चिकाटीही असते. विदेशात केळी पोहोचल्यानंतर पॅकिंगमध्ये काही दोष आढळल्यास या मजुरांकडून पैसे वसूल करण्याची पद्धत असल्यामुळे हे मजूर प्रामाणिकपणे काम करताना दिसून येतात. 

परप्रांतीय मजुरांची कामावरील निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची गरज नसते. परंतु सर्व मजूर आपल्या गावी गेल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. मजुरांना परत आणण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न होण्याची गरज आहे.
 - रंगनाथ शिंदे, केळी निर्यातदार.

परप्रांतीय मजूर गेल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे, परंतु स्थानिक मजुरांना संधी निर्माण झाली आहे. अशा मजुरांना निर्यातदार व्यापाºयांकडून प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल़                                       
 - सुयोग झोळ, केळी उत्पादक़

Web Title: Due to the hard work of foreigners, bananas from Karmalya in Arab countries ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.