दुष्काळाचे निकष बदलणार : मुख्यमंत्री
By Admin | Updated: August 19, 2014 00:58 IST2014-08-19T00:58:57+5:302014-08-19T00:58:57+5:30
काँग्रेस कमिटी : कार्यकर्त्यांशी संवाद

दुष्काळाचे निकष बदलणार : मुख्यमंत्री
सोलापूर : सध्या प्रचलित असलेली पावसाची सरासरी करण्याची पद्धत चुकीची असल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष बदलण्याची गरज आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे निकष ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस पडतो, पावसाच्या या विसंगत आकडेवारीचा सरासरीवर परिणाम होतो. बहुतेक वेळा एकाच तालुक्यात एखाद्या गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर त्याच तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. तरीही सरासरी वाढल्याने अवर्षणग्रस्त जनतेवर अन्याय होतो. हा अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्याची दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे निकष ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारी उपलब्ध होताच निर्णय घ्यावा लागेल असे सांगताना दुष्काळग्रस्तांना सर्व सोयी—सवलती देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. राज्यातील ११ जिल्ह्यांत पावसाची सरासरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असली तर उर्वरित जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------
नेत्यांना चिंता...
सध्याच्या दुष्काळी स्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी मोहोळचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली. आ. भारत भालके यांनी मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
--------------------------------