सोलापूर : आधी नस कापली... नंतर गळा चिरून डॉ. आदित्य नांबियार (वय २४, रा. मुंबई) याने सोलापुरात आपल्या रूममध्ये आत्महत्या केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर १२ दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आदित्यला १५ दिवसांपूर्वीच मिळाली हाेती एमबीबीएसची पदवी
मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.
मंगळवारी वडिलांनी आदित्यला सकाळी फोन केला; पण त्याने फोन घेतला नाही. यामुळे त्यांनी आदित्यच्या मित्राला पाहण्यास सांगितलेे. दरवाजा तोडून आत गेल्यावर आदित्य बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
घटनास्थळी दोन इंजेक्शन, सलाइन, पाकीट आढळले
घटनास्थळी तेथे दोन इंजेक्शन, सलाइन, माेबाइल, पाकीट, आदी वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्यता आहे.
आदित्य हा अबोल असल्याने आम्हाला त्याच्या तणावाविषयी वा इतर कोणत्याही कारणांची माहिती नव्हती. हे वृत्त ऐकून आम्हालाही धक्का बसला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.