महापालिकेत दिवाळी
By Admin | Updated: August 15, 2014 00:39 IST2014-08-15T00:39:46+5:302014-08-15T00:39:46+5:30
फटाक्यांची आतषबाजी : माकप-बसपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

महापालिकेत दिवाळी
सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिल्याचे कळताच महापालिकेत माकप व बसपा कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत आणि ढोल-ताशांचा निनाद करीत एकच जल्लोष केला.
चंद्रकांत गुडेवारांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिल्याचे कळताच महापालिकेत दिवाळी साजरी झाली. आडम मास्तर, नलिनी कलबुर्गे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेत येऊन आयुक्त कार्यालयावरील गुडेवारांच्या नेमप्लेटला हार घातला. फटाक्यांची आतषबाजी करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. जनरल कामगार युनियन अशोक जानराव, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, शाहू शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी जल्लोष केला. पी. बी. ग्रुपतर्फे लाडू वाटण्यात आले. इंद्रभवनसमोर सायंकाळपर्यंत बँजो व फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.
बदली झाल्यानंतर गुडेवार यांनी २७ जून रोजी पदभार सोडला होता. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर गुडेवार नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. आज न्यायालयाचा निकाल झाल्यावर ते बाहेरगावी होते. रात्री ते महापालिकेत आले व सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे पदभार घेतल्याची कागदपत्रे सादर केली. याप्रसंगी सहायक आयुक्त अमिता दगडे व इतर अधिकारी उपस्थित होते. माजी महापौर आरिफ शेख, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी त्यांचे स्वागत केले.
बदली झाल्यानंतर आयुक्तांची बदली न्यायालयाने रद्द करण्याची महापालिकेच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यास बदली झाल्यानंतर नागरिकांच्या पाठबळामुळे पुन्हा पदावर रुजू व्हावे लागले आहे. आयुक्त नसल्याने गेला दीड महिना कामावर परिणाम झाला होता. पंधरा आॅगस्टच्या पूर्वसंध्येला आयुक्त रुजू झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
-----------------------------
जोमाने काम करेन...
सर्वसामान्य लोकांनी माझ्या विकासकामाची पावती दिली आहे. सोलापूरचा विकास हाच उद्देश ठेवून मी कामाला सुरुवात केली होती. आता दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर आणखी नव्या जोमाने काम करेन. पाणी व रस्त्याच्या प्रश्नाला माझे प्राधान्य असेल असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार म्हणाले.