Solapur Market; ऑनलाइन क्लास, वर्कमुळे मोबाइल बाजारात ‘दिवाळी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:28 IST2020-10-09T13:20:18+5:302020-10-09T13:28:43+5:30
Solapur Market News उत्तम ब्रँड्सची मागणी; मुलांसाठी पालकांनी घेतले स्वतंत्र हॅण्डसेट अन् टॅब

Solapur Market; ऑनलाइन क्लास, वर्कमुळे मोबाइल बाजारात ‘दिवाळी’!
राकेश कदम
सोलापूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात कार्यालये बंद झाली. मात्र लोकांना आॅनलाइन कामांची सवय लागली. शाळा, महाविद्यालये अजूनही बंद आहेत. परंतु, आॅनलाइन शिक्षण ही संकल्पना घरोघरी रुजत आहे. याचा परिणाम म्हणून मोबाइल, अॅसेसरीज बाजारात दोन महिने आधीच दसरा-दिवाळी साजरी झाली आहे. बाजारातील तेजी आजही कायम असल्याचे दुकानदारांचे मत आहे.
शहरात मोबाइल हॅण्डसेट, अॅसेसरीज विक्रीची १८० तर ग्रामीण भागात २५० हून अधिक मोठी दुकाने असल्याचे सोलापूर मोबाइल असोसिएशनचे पदाधिकारी सांगतात. चार महिने दुकाने बंद होती. बाहेर अनेक लोकांच्या हाताला काम नव्हते. यापुढील काळात महागड्या मोबाइलची फारशी विक्री होणार नाही.
लोक साधा मोबाईल घेण्यापूर्वी विचार करतील, असे अनेकांचे मत होते. परंतु, आॅनलाइन कामांसाठी आपल्याकडे चांगला मोबाईल असावा, या भावनेतून लोकांनी चांगल्या ब्रॅण्डचा मोबाइल खरेदी करण्यास सुरुवात केली. जून-जुलै महिन्यात शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर वर्षभर आॅनलाइन शिक्षण घ्यावे लागेल, असे पालकांना सांगण्यात आले. पूर्वी घरात आई-वडिलांकडे प्रत्येकी एक-एक फोन होता. पण बहुतांश पालकांनी मुलांसाठी स्वतंत्र फोन आणि टॅबची खरेदी केली.
शहरात लॉकडाऊनपूर्वी दरमहा २० ते २२ हजार हॅण्डसेटची विक्री व्हायची. गेल्या दोन महिन्यात दरमहा ३२ ते ३५ हजार हॅण्डसेटची विक्री झाली आहे. आम्हीसुद्धा अशाप्रकारे व्यवसायात तेजी येईल याची कल्पना केली नव्हती. स्टॉक नव्हता. गरज म्हणून लोकांनी आजवर न विकल्या जाणाºया ब्रॅण्डच्या हॅण्डसेटची खरेदी केली.
- इशाम शेख, सोलापूर मोबाइल असोसिएशन
सर्वच मोबाइल कंपन्यांनी या काळातही नवे मॉडेल लाँच केले. फायनान्सची सुविधा आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांनी पैशाची बचत केली. आॅनलाइन कामे, शिक्षण यामुळे लोकांना मोबाइलची अधिक आवश्यकता भासली. यातून मोबाइलमध्ये दिवाळी साजरी झाली आहे.
-पंकज फाटे,
संजय एंटरप्रायजेस.