समांतर जलवाहिनीच्या विषयांवर महापालिकेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:05 IST2018-04-17T14:04:37+5:302018-04-17T14:05:10+5:30

समांतर जलवाहिनीच्या विषयांवर महापालिकेत गोंधळ
सोलापूर : सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने उपसुचना मांडल्या़ १२४० कोटीची योजना साकार करावी व टाकळी ते सोरेगांव येथुन स्मार्ट सिटीतून आणखीन एक जलवाहिनी घालावी असा त्यांचा विरोध होता़ चर्चेअंती दोन उपसुचना असतानाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे घोषित केले़ याला विरोधकांनी आक्षेप घेतला़ दोन उपसुचनेवर मतदान घ्या, बेकायदेशीरपणे विषय मंजूर कसा करता असा आक्षेप घेतला़
महापौरांनी विरोधकांचा आक्षेप न जुमानता सभा एक तासासाठी तहकुब केली़ त्यावर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला़ महापौरांचा निषेध केला़ महापौर गेल्यानंतर आयुक्तांच्या पाठोपाठ नगरसचिव प्रविण दंतकाळे हे सभागृहाबाहेर जात असताना विरोधकांनी त्यांना अडविले व खेटत खुर्चीवर बसा असा सज्जड दम भरला़ ही बाब आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या निर्देशनास आल्यानंतर ते परत फिरले़ संतप्त सदस्यांची समजूत काढली़ त्यानंतर तणाव निवळला़ शासनाने १३ एप्रिल रोजी अमृत योजनेतून सोलापूरसाठी ४३९ कोटींची समांतर जलवाहिनीची योजना मंजूर केली आहे़ या योजनेला मंजूरी देण्याच्या प्रस्तावावरून हा गोंधळ झाला़