वाद जागामालक अन् भाडेकरूंचा; सोलापुरच्या नवीपेठेतील जीव धोक्यात ग्राहकांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:01 IST2018-12-04T11:59:29+5:302018-12-04T12:01:59+5:30
अनेक जुनी बांधकामे धोकादायक : कागदी घोडे नाचवत महापालिकेकडून केवळ नोटिशीचा फार्स

वाद जागामालक अन् भाडेकरूंचा; सोलापुरच्या नवीपेठेतील जीव धोक्यात ग्राहकांचा
राकेश कदम।
सोलापूर : नवीपेठेतील इंडिया जनरल स्टोअर्सच्या इमारतीच्या वरच्या मजल्याचा काही भाग रविवारी रात्री कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र नवीपेठ आणि परिसरात असे १० हून अधिक धोकादायक इमारती असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने इमारतींच्या मालकांना केवळ नोटीस देण्याचा फार्स केला आहे. कागदी घोड्यांच्या खेळात नवीपेठेत येणाºया ग्राहकांचा जीव मात्र धोक्यात आहे.
शहरात २३९ इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपा दप्तरी आहे. दत्त चौकाच्या कोपºयापासून नवीपेठेच्या पार्किंगपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर सहा इमारतींचे मजले जीर्ण झाले आहेत. इमारतीवर झाडे उगवली आहेत. तरीही त्यात दुकाने सुरू आहेत. फॅशन कॉर्नरच्या बाजूला आणखी एका इमारतीचा मजला जीर्ण अवस्थेत आहे. त्यावर एका मोबाईल कंपनीचा भला मोठा बोर्डही डकविण्यात आला आहे.
नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय पुकाळे म्हणाले, नवीपेठ ही गावठाण भागात विकसित झालेली बाजारपेठ आहे. येथे अनेक जुन्या वाड्यांचा व्यवसायासाठी वापर होत आहे. मातीने बांधलेल्या अनेक इमारती आहेत. अनेक पावसाळे झेलून काही इमारतींच्या दर्शनी भागाची पडझड झाली आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे मनपा कारवाईत अडथळे येतात. उद्या एखाद्या ग्राहकाचा बळी गेला तर त्याला कोण जबाबदार? काळाची गरज ओळखून काही इमारतींबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कालच्या घटनेनंतर व्यापारी आणि ग्राहकही चिंतेत आहेत.
ग्राहकांची ये-जा सुरू असताना पाडकाम...
- - रविवारी रात्री इमारत कोसळल्यानंतर नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्यासह बांधकाम विभागातील अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रविवारी रात्री काही भाग हटविण्यात आला. सोमवारी सकाळी जेसीबीच्या सहायाने काही भाग पाडण्यात आला. दुपारी वर्दळ सुरू असताना मनपाचे कर्मचारी विटा, पत्रे हटविण्याचे काम करीत होते. इमारतीच्या आजूबाजूला दक्षतेचे फलक लावलेले नव्हते. सायंकाळी वेल्डर पत्रा कापून काढत होता तेव्हा शेजारी रस्त्यावरून लोक ये-जा करीत होते.
शहरात २३९ धोकादायक इमारती
- - महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार, शहरात २३९ धोकादायक इमारती आहेत. यातील काही इमारतींचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पण त्याचा अहवाल मनपा दप्तरी आलेला नाही. नवीपेठेतील घटनेनंतर या यादीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये धोकादायक इमारतींवर नगरपालिकेने दक्षतेसाठी फलक लावले आहेत. पण महापालिकेने नवीपेठेत अशी दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही.
फौजदारीचा इशारा
नवीपेठेतील रविवारी रात्री कोसळलेली इमारत सुरेश गुर्बानी यांच्या मालकीची आहे. या जागेत उमरसाब दादुमिया काखंडीकर भाडेकरू आहेत. मालक आणि भाडेकरूमध्ये वाद सुरू असल्याचे मनपा अधिकाºयांचे म्हणणे आहे. या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असून, तो मजबूत करावा किंवा हटविण्यात यावा, अशा आशयाचे पत्र महापालिकेने २००४ ला दिले होते. यानंतर २०१५ मध्ये दोन वेळा, २०१६ आणि २०१७ मध्ये पुन्हा नोटीस बजावण्यात आली. परंतु, धोकादायक भाग तसाच राहिला. सहायक अभियंता रामचंद्र पेंटर म्हणाले, महापालिकेकडून आता मालक आणि भाडेकरूला नोटीस बजावणार आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल.