धनगर समाज आरक्षणप्रश्नी मार्ग काढला जाईल : मुख्यमंत्री
By Admin | Updated: August 3, 2014 22:46 IST2014-08-03T21:57:18+5:302014-08-03T22:46:46+5:30
शिष्टमंडळाला आश्वासन : निश्चित भूमिका ठरवा, तज्ज्ञांची समिती नेमा

धनगर समाज आरक्षणप्रश्नी मार्ग काढला जाईल : मुख्यमंत्री
कोल्हापूर : आरक्षणप्रश्नी आधी निश्चित भूमिका ठरवा. त्याबाबत चर्चा करण्यासाठी समाजातील तज्ज्ञांची समिती नेमा. समितीसमवेत चर्चा करूनच धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी मार्ग काढणे सोयीस्कर होणार आहे. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज, रविवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री चव्हाण यांची या समितीच्या शिष्टमंडळाने विमानतळावर भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते.धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावा, अशी मागणी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. त्यावर अनुसूचित जाती-जमातींच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करावा, तसेच एस. टी. कॅटेगरीला हात न लावता आरक्षण द्यावे, अशा दोन वेगळ्या मागण्या होत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. आरक्षणासाठीचे उपोषण सोडण्यावेळी ‘महायुती’तील एका नेत्याच्या सांगण्यावरून वेगळी भूमिका घेणे योग्य नाही. अशा वेगवेगळ्या मागण्या होत राहिल्या, भूमिका असल्या, तर आरक्षणप्रश्नी कसा मार्ग काढायचा? त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका घेऊ नका. आरक्षणप्रश्नी आधी निश्चित भूमिका ठरवा. त्याबाबत चर्चा करण्यासाठी समाजातील चार-पाच तज्ज्ञांची समिती तयार करा. या समितीशी चर्चा करून आरक्षणप्रश्नी मार्ग काढला जाईल. शासनाची भूमिका सकारात्मक आहे. त्याला त्या दृष्टीने सहकार्य करा, असे त्यांनी सांगितले.शिष्टमंडळात बबन रानगे, जयराम पुजारी, नागेश पुजारी, मलकारी लव्हटे, प्रकाश पुजारी, विठ्ठल चोपडे, मच्छिंद्र बनसोडे, जयवंत ताटे, आदींचा समावेश होता. दरम्यान, येत्या काही दिवसांत आरक्षणाचा लढा व्यापक केला जाईल, असे बबन रानगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कार्यकर्ते झाले आक्रमक
दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत आरक्षणप्रश्नी काहीच निर्णय झालेला नसल्याने मुख्यमंत्री चव्हाण यांना काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन धनगर समाज आरक्षण कृती समितीने केले होते. त्यानुसार सुमारे चारशे कार्यकर्ते विमानतळावर आले होते. त्यांना पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर रोखले. आत घुसून निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसविले. त्यावर अन्य कार्यकर्ते आक्रमक झाले. हे प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी समितीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांना मुख्यमंत्री चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहावर भेटीसाठी वेळ देऊ असे सांगितले. मात्र, या नेत्यांनी विमानतळावरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर निदर्शने रद्द केली. तसेच ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले. ठरल्याप्रमाणे समितीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.