भुयारी पोहोच रस्त्याच्या मागणीला केंद्राकडून मिळाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:20+5:302021-09-14T04:26:20+5:30
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नारायण चिंचोली येथे १५ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. संबंधित विभाग व प्रशासनाला नारायण ...

भुयारी पोहोच रस्त्याच्या मागणीला केंद्राकडून मिळाला हिरवा कंदील
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नारायण चिंचोली येथे १५ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. संबंधित विभाग व प्रशासनाला नारायण चिंचोली येथे भुयारी पोहोच रस्ता करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. यावेळी नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने खा. रणजितसिंह निंबाळकर व आ. प्रशांत परिचारक यांना भेटून निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत आ. प्रशांत परिचारक यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत नारायण चिंचोली येथे भुयारी रस्ता करण्याची मागणी लावून धरली होती.
या मागणीची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नारायण चिंचोली येथे भुयारी पोहोच रस्ता करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असून संबंधित कामाला मंजुरी दिली आहे. अशा आशयाचे पत्र ग्राम प्रशासनाला आले असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण धनवडे यांनी दिली. येथे भुयारी रस्ता मंजूर झाल्यामुळे नारायण चिंचोली ग्रामस्थांची ये-जा करण्यासाठी होणारी अडचण दूर होणार आहे. नारायण चिंचोली ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक यांचे आभार मानले. तर आ. प्रशांत परिचारक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.