टेंभुर्णी बाह्यवळणावर कारच्या धडकेत मित्राचं लग्न उरकून निघालेल्याचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Updated: February 26, 2024 22:53 IST2024-02-26T22:53:09+5:302024-02-26T22:53:20+5:30
आकाश संजय बोलवणकर असे मृत व्यक्तीचे नाव

टेंभुर्णी बाह्यवळणावर कारच्या धडकेत मित्राचं लग्न उरकून निघालेल्याचा मृत्यू
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या मोटारसायकलला कारची जोरात धडक बसून मित्राचं लग्न उरकून निघालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. आकाश संजय बोलवणकर (वय २५, रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे, मुळ रा. बुलढाणा) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून २६ फेब्रवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान टेंभुर्णी येथे सोलापूर बाह्य वळणावर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेला त्याचा सहकारी प्रदीप आव्हाळे (वय २५ रा. टॉवर लाईन, निगडी, जि. पुणे, मुळ रा. धाराशिव) याच्यावर टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पुणे येथे एकाच कंपनीत काम करत असलेल्या सहकारी मित्राचा लग्नासाठी मयत आकाश बोलवणकर आणि त्याचा सहकारी आव्हाळे हे दोघे मोटारसायकल (एम. एच. १९ / इ. एच. २३६८) वरून २५ फेब्रुवारीला सोलापूर येथे गेले होते. लग्न उरकून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुणे येथे कामाच्या ठिकाणी परत निघाले होते. टेंभुर्णी येथे सोलापूर बाह्य वळणावर रस्ता क्रॉस करत असलेल्या कार (एम. एच. १३/ बी. एन. ४६०४) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात आकाशचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला प्रदीप आव्हाळे हा गंभीररित्या जखमी झाला. त्यास येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशीरा पर्यंत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.